सोनवद तलावावर स्थलांतरित पक्ष्यांचा मुक्काम कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:37 IST2021-05-19T04:37:14+5:302021-05-19T04:37:14+5:30
सध्या कडक उन्हाळा वाढलेला आहे. वातावरणातील तापमान वाढले आहे. परिणामी, नदी, तलाव, सरोवरे यातील पाणी आटत चालले आहे. अशा ...

सोनवद तलावावर स्थलांतरित पक्ष्यांचा मुक्काम कायम
सध्या कडक उन्हाळा वाढलेला आहे. वातावरणातील तापमान वाढले आहे. परिणामी, नदी, तलाव, सरोवरे यातील पाणी आटत चालले आहे. अशा परिस्थितीमध्ये वन्य पशुपक्षी पाण्याच्या शोधात भटकंती करतात. त्याचाच परिणाम आपल्या धुळे शहरालगतच्या परिसरात पक्ष्यांची संख्या रोडावलेली दिसते, परंतु धुळे शहराजवळ असलेल्या सोनवद येथील तलावावर वेगळे चित्र बघायला मिळते. दरवर्षी हिवाळ्यात, उत्तरेकडील प्रदेशातील पाहुणे पक्षी लांब प्रवास करून आपल्या परिसरात स्थलांतर करून येतात. उन्हाळा सुरू होण्यापूर्वी फेब्रुवारी-मार्चपर्यंत ते मायदेशी परत फिरतात. मात्र, या वर्षी सोनवद तलावावर काही परदेशी स्थानांतरित पाहुणे पक्ष्यांच्या प्रजाती मे महिन्यात ही दिसून आल्या आहेत. धुळे येथील निसर्गवेध संस्थेचे अभ्यासक संदीप बागल, डॉ.प्रशांत पाटील व डॉ.विनोद भागवत यांनी नुकत्याच केलेल्या अभ्यास मोहिमेत ४६ प्रजातींच्या ६०६ परदेशी स्थलांतरित पक्ष्यांच्या नोंदी केल्या आहेत. या विशेष उल्लेखनीय नोंदीत ७ रोहित पक्षी, कवड्या धीवर पक्ष्यांचे कुटुंब, ठिपक्यांच्या टिलवा, छोटा आर्ली, तसेच छोटा टिलवा, कल्लेदार सुरय, केंटीश चिखल्या असे काही पक्षी अजूनही येथे रेंगाळताना दिसून आले.
निरीक्षणात या पक्षांच्या शरीराच्या रंगसंगतीमध्ये बदल झालेला दिसला. यावरून असे दिसते की, हे पक्षी आता विणीच्या काळातील नवीन पेहेरावात आलेले आहेत. असे परदेशी स्थलांतरित पक्षी मे महिना अखेरी कडक उन्हाळ्यातही आपल्या प्रदेशात अजून मुक्काम वाढवत आहेत, म्हणजेच कदाचित हे निसर्गातील होणाऱ्या बदलाचे गंभीर संकेत असू शकतात. सोनवद तलावावर दिसलेल्या पक्ष्यांच्या रंगसंगतीतून विणीच्या हंगामाची सुरुवात झालेली दिसते. त्यांचा परतीचा प्रवास अजून बाकी आहे, परंतु वेळ आणि वातावरणातील बदल याच्यामध्ये तफावत असल्याने, त्यांना प्रवासातच पेहराव बदलावा लागतो आहे. यामुळे कदाचित अशा प्रकारचे चित्र आज आपल्याला पाहायला मिळते, असे ज्येष्ठ पक्षी अभ्यासक डॉ.विनोद भागवत हे सांगतात. पक्षीप्रेमींनी अभ्यास करून पर्यावरण व निसर्ग संवर्धनात आपले योगदान द्यावे, आवाहनही त्यांनी यावेळी केले, अशी माहिती प्रा.डॉ.प्रवीणसिंग गिरासे यांनी दिली.