बचतगटांचा मार्गदर्शनपर मेळावा उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 12:10 IST2020-03-16T12:09:51+5:302020-03-16T12:10:41+5:30
दोंडाईचा : परिसरातील ५१ बचतगटाच्या २५० महिलांचा सहभाग

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
दोंडाईचा : येथील पांडुरंग बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व अनुलोम संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दोंडाईचा शहर व परिसरातील बचतगटांना मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमात ५१ बचत गटाच्या सुमारे २५० महिला उपस्थित होत्या.
दोंडाईचा येथील व्यापारी भवनात विविध बचत गटातील महिलांना विविध उद्योग धंदे, बचतगटांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी नाबार्डचे विवेक पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून आयोजक पांडुरंग बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा पुजा नितिन खडसे, अनुलोम संस्थेचे निलेश राजपूत, पंचायत समितीचे महेंद्र ठाकरे, बचतगट प्रवर्तक अनिल भावसार उपस्थित होते.
पूजा खडसे यांनी प्रास्ताविकातून विविध बचतगटांना शासनाच्या योजना, बचतगटाच्या महिलांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळवून देणे, त्यांच्या उद्योग व्यवसायाला हातभार लावून त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले.
विवेक पाटील म्हणाले, बचतगटातील महिला विविध वस्तू बनवितात. त्यात शोभेच्या वस्तू, गोधडी व इतर वस्तू तयार करतात. काही महिला ब्युटीपार्लर, टेलरींग, पिठाची गिरणी यातून सेवा देतात. विविध वस्तू उत्पादन व सेवा देताना महिलांना अडचणींना सामोरे जावे लागते. बनविलेल्या वस्तूंच्या मार्केटींगला अडचणी येतात, यावर चर्चा करण्यासाठी कार्यक्रम आहे. तुमच्या अडचणी सोडविल्या जातील. तुम्हाला एन.यू.एल.एम.च्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जाईल. तालुका जिल्हा, राज्य पातळीवर बचत गटातील महिलांना मार्केटिंग संधी उपलब्ध करून देण्यासाठी नाबार्ड मदत करणार असल्याचे आश्वासन दिले.
पंचायत समितीचे महेंद्र ठाकरे, अनुलोम निलेश राजपूत यांनीही महिलांना बचतगट व येणाऱ्या अडचणी सोडविण्याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमास सदस्य रेवती बागुल, लक्ष्मी ठाकूर, विजया ठाकूर, सरिता महाजन आदींसह ५१ बचतगटाच्या सुमारे २५० महिला उपस्थित होत्या. सुत्रसंचलन रेवती बागुल यांनी केले. आभार पूजा खडसे यांनी केले.