धुळ्यातील मानाचा गणपती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:42 IST2021-09-14T04:42:28+5:302021-09-14T04:42:28+5:30
सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रणेते लोकमान्य टिळकांनी १८९४ मध्ये पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सवाला प्रारंभ केल्यानंतर दुसऱ्याच वर्षी १८९५ ला खान्देशात सार्वजनिक ...

धुळ्यातील मानाचा गणपती
सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रणेते लोकमान्य टिळकांनी १८९४ मध्ये पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सवाला प्रारंभ केल्यानंतर दुसऱ्याच वर्षी १८९५ ला खान्देशात सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात झाली. खान्देशातील सार्वजनिक गणेशोत्सवाचा इतिहास तसा वैभवशाली आहे. लोकमान्य टिळकांची प्रेरणा घेऊन धुळ्यातील खांबेटे गुरुजींनी धुळ्यात पहिला सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला. गुरुजींनी स्थापन केलेल्या गणपतीची गणेशोत्सवातील मिरवणूक सुरवातीच्या काळात वादग्रस्त ठरली. कारण स्थापनेच्या दिवशी आणि विसर्जनाच्या दिवशी येथील गणेशमूर्तीची सवाद्य निघणारी मिरवणूक एका प्रार्थनास्थळाजवळून जात होती. प्रार्थना स्थळाजवळून सवाद्य मिरवणूक काढण्यास काहींनी विरोध केला. त्यातून किरकोळ वादविवाद झाले. दरम्यान, प्रार्थना स्थळाच्या मार्गावरून निघणाऱ्या सवाद्य मिरवणुकीसाठी सरकारकडून परवानगी घेण्यात यावी असा हकूम तत्कालीन ब्रिटिश प्रशासनाने जारी केला. त्यावरून दोन समाजात मतभेद निर्माण झाले. सुभाष नगरातील श्रींच्या मूर्तीची विसर्जन मिरवणूक १ सप्टेंबर १८९५ ला निघाली. मिरवणूक प्रार्थनास्थळाजवळ येताच पुन्हा वाद उफाळले. त्यामुळे दंगल झाली. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात चारजण मरण पावले. तेव्हापासून खांबेटे गुरुजींनी स्थापन केलेल्या गणपतीला श्री खुनी गणपती तर संबंधित प्रार्थनास्थळालाही तेच नाव पडले. पुढे जातीवर्गातील तेढ कमी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न झाले. मानाचा गणपती म्हणून असलेल्या श्री खुनी गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत हिंदूंबरोबर मुस्लिम बांधवही सहभागी होऊ लागले. विसर्जन मिरवणूक खुनी मशिदीजवळ आल्यावर मुस्लिम बांधव या मिरवणुकीचे स्वागत करतात. ही परंपरा आजही कायम आहे. यातून जातीय सलोख्याचे दर्शन होत असते.