रात्री पार्टी, बहिणीला व्हिडीओ कॉल अन् पहाटे पत्नीचा मृत्यू; मृतदेह सोडून विधानसभा अध्यक्षांचा पुतण्या फरार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2025 08:48 IST2025-10-21T08:47:51+5:302025-10-21T08:48:57+5:30
उत्तर प्रदेशात सिमेंट व्यावसायिकाच्या पत्नीच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ उडाली आहे.

रात्री पार्टी, बहिणीला व्हिडीओ कॉल अन् पहाटे पत्नीचा मृत्यू; मृतदेह सोडून विधानसभा अध्यक्षांचा पुतण्या फरार
Nikita Mahana Death: उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये एका सिमेंट व्यावसायिकाच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. सिमेंट व्यावसायिक पार्थ महाना याची पत्नी निकिता महाना हिचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर मृत महिलेच्या माहेरच्यांनी तिचा पती आणि सासरच्या मंडळींवर १० लाख रुपयांच्या हुंड्याच्या मागणीसाठी खून केल्याचा गंभीर आरोप केला. निकिताच्या ळ्यावर आणि मानेवर जखमांच्या खुणा असल्याने कुटुबियांनी ही आत्महत्या नसून हुंड्यासाठी केलेली हत्या असल्याचा आरोप केला.
नेमकी घटना काय?
दिल्लीतील मालवीय नगर येथील रहिवासी असलेल्या निकिताचा विवाह ७ डिसेंबर २०२२ रोजी कानपूरच्या डिफेन्स कॉलनीतील पार्थ महाना याच्याशी दिल्लीतील क्राउन प्लाझा हॉटेलमध्ये मोठ्या थाटामाटात झाला होता. या समारंभाला विधानसभा अध्यक्ष सतीश महाना यांच्यासह अनेक मोठे नेते उपस्थित होते. निकिताची बहीण मुस्कान आणि आई सुनीता यांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नानंतर काही महिन्यांतच पार्थ आणि त्याचे कुटुंबीय १० लाख हुंड्यासाठी निकिताला शारीरिक आणि मानसिक त्रास देऊ लागले. सासू हुंडा न आणल्याबद्दल टोमणे मारायची आणि तिला जेवण देण्यापूर्वीही विचारले जायचे, असे मुस्कानने सांगितले.
शनिवारी आणि रविवारच्या मध्यरात्री ही घटना घडली. निकिता आणि पार्थ एका पार्टीतून रात्री उशिरा घरी परतले होते. घरी पार्थ मोबाईलवर कोणाशी तरी बोलत असताना दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. यानंतर निकिताने तिची लहान बहीण मुस्कानला व्हिडिओ कॉलही केला होता. पार्थच्या म्हणण्यानुसार, यानंतर निकिताने स्वतःला खोलीत कोंडून गळफास लावला.
जखमांच्या खुणा आणि गंभीर आरोप
पहाटे ३.३० च्या सुमारास पार्थने निकिताच्या आईला फोन करून निकिताची तब्येत खूप गंभीर आहे, तातडीने लखनऊला या, असे सांगितले. मात्र, नेमके काय झाले हे त्याने सांगितले नाही. सकाळी ७.३० वाजता निकिताच्या मावशीने पार्थच्या आत्याला फोन केल्यावर निकिताचा मृत्यू झाल्याचे समजले. दिल्लीहून आलेल्या निकिताच्या कुटुंबीयांना लखनऊच्या अपोलो रुग्णालयात तिचा मृतदेह दाखवण्यात आला. मृतदेहावर, गळ्यावर आणि मानेवर, मारहाणीच्या आणि जखमांच्या खोल खुणा होत्या. हे गळफास लावण्याचे नाटक आहे, ही स्पष्टपणे हत्या आहे, असा आरोप निकिताच्या कुटुंबियांनी केला. पार्थ नशेत निकिताला रुग्णालयात घेऊन आला आणि तिला तिथे सोडून फरार झाला, असाी आरोप कुटुंबियांनी केला.
राजकीय आणि पोलीस दबावाचा आरोप
निकिताच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे की, पार्थ महानाचे चुलते विधानसभा अध्यक्ष सतीश महाना आहेत. पार्थचे कुटुंब खूप श्रीमंत आहे आणि त्यांना सतीश महाना यांचा पूर्ण पाठिंबा आहे. त्यांच्या दबावामुळेच पोलीस आमच्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत नाहीत, असा गंभीर आरोप निकिताच्या आईने केला. दरम्यान, निकिताचे वडील राजेश कुमार यांनी पती पार्थ महाना, सासरे राजीव महाना, सासू गीता महाना आणि नणंद श्रेया महाना यांच्याविरोधात कृष्णा नगर पोलीस ठाण्यात हुंडाबळी आणि खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
गुन्हा दाखल, तपास सुरू
डी.सी.पी. साऊथ निपुण अग्रवाल यांनी सांगितले की, गुन्हा दाखल करण्यात आला असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल आणि आरोपींना लवकरच अटक केली जाईल. या प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस पथके तैनात करण्यात आली आहेत. निकिताच्या माहेरच्यांनी रुग्णालयात कोणतेही सासरचे लोक किंवा पोलीस उपस्थित नव्हते, तसेच शवविच्छेदन करण्यापूर्वी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.