शिरपूर-शहादा रोडवर खड्डेच खड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 22:44 IST2019-11-25T22:43:56+5:302019-11-25T22:44:23+5:30
नूतनीकरणाची मागणी : जीवघेण्या प्रवासाने वाहन चालकांतून संताप

शिरपूर-शहादा रोडवर खड्डेच खड्डे
शिरपूर : अंकलेश्वर-बºहाणपूर या राज्य मार्गावरील शिरपूर ते शहादा दरम्यान रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडल्यामुळे वारंवार अपघात होत आहे़ रस्त्यांची खड्डयांमुळे अक्षरश: चाळण झाली आहे़ संबंधित बांधकाम विभागासह काम मंजूर असतांना न करणाºया ठेकेदाराविरोधात मनुष्य सदोषाचा गुन्हा नोंदविण्याची मागणी केली जात आहे़
विधानसभा निवडणूकांच्या आधी रस्त्यांसाठी कोट्यावधी रूपयांचा निधी मंजूर झाल्याच्या बतावण्या करणाºया लोकप्रतिनिधींनी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात दुचाकीवरून फेरफटका मारावा़ मग त्यांच्या लक्षात येईल की, सध्या ग्रामीण भागात किती जीवघेणा प्रवास सुरू आहे़ सर्व जिल्ह्या मार्गांची खड्डयांनी अक्षरश: चाळण झाली आहे़ खड्डे चुकवितांना दुचाकी, रिक्षा, चारचाकींचे छोटे-मोठे अपघात होत आहेत़ मात्र अगदी नोव्हेंबर निम्मेच्यावर झाला तरी बांधकाम विभागाकडून रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची साधी तसदी देखील घेतली गेलेली नाही़ जिल्ह्यातील काही मोजकेच रस्ते सुस्थितीत आहेत़ मात्र उर्वरीत सर्वच रस्त्यांवरून गाडी चालविणे सध्या अतिशय जिकिरीचे बनत आहे़ रस्ते सुधारण्यासाठी प्रत्येकीवेळी आंदोलनेच करायची काय? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे़ शिरपूर-शहादा मार्गाची चांगलीच चाळण झालेली दिसते़ त्या डांबरी रस्त्यावर डांबर न दिसता खड्डे झालेले दिसतात़ बहुतांशी ठिकाणी खड्यांमुळे रस्ता वाहतुकीस अत्यंत धोकादायक बनला आहे़ या रस्त्यावरून वाहने चालवितांना रस्ता कुठे आहे? तो शोधावा लागत आहे़ मोठी वाहने गेल्यावर पाठीमागून येणाºया वाहन चालकांना धुळीचा सामना करावा लागत आहे़
रस्ते गेले खड्डयांत, कोट्यवधी गेले कुठे ?
बांधकाम विभागाने कळमसरे उड्डाण पूल ते तºहाडी-तोरखेडा पर्यंत रस्ता दुरूस्ती व नव्याने तयार करण्यासाठी गेल्या १२ डिसेंबर २०१८ रोजी वर्क आॅर्डर काढून ६ कोटी ८७ लाख रूपये मंजूर करून सदर काम कटारीया नामक ठेकेदाराने घेतले़ सदर काम अवघे ६ महिन्यात पूर्ण करणे आवश्यक असतांना देखील अद्यापपर्यंत त्या कामाला सुरूवात नाही़ साधे या मार्गावरील खड्डे सुध्दा भरायला सुरूवात केलेली नाही़ जर कामच करावयाचे नव्हते तर त्या ठेकेदाराने का हे काम घेतले, त्यावर जिल्हा बांधकाम विभागाने आतापर्यंत का कारवाई केली नाही़ सदर काम ६ महिन्याचे आत करण्याचे आदेश असतांना ते लोटून सुध्दा त्या ठेकेदाराला का म्हणून दंड दिला जात नाही़ याच ठेकेदाराने पुन्हा दहिवद फाटा ते गलंकीपर्यंत रस्ता दुरूस्तीचे काम घेतले आहे़ त्या रस्त्यावर देखील खड्डे पडले आहेत़ त्याचे देखील कामे झालेली नाहीत़ बांधकाम विभागाचे अधिकारी व संबंधित ठेकेदारांमध्ये साटेलोटे असल्यामुळे त्याकडे बांधकाम प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचे बोलले जात आहे़
महामार्गावर देखील खड्डे़़़
मुंबई-आग्रा महामार्गावरील शिरपूर ते पळासनेर गावा दरम्यान देखील खड्डे पडले आहेत़ खड्डे चुकवितांना वारंवार अपघात होत आहेत़ सद्भाव कंपनीने तातडीने या मार्गावर पडलेले लहान-मोठे खड्डे तातडीने बुजवावेत अशी मागणी केली जात आहे़
खड्डेमय रस्त्यावरून गरोदर महिला, शालेय विद्यार्थी, वयोवृध्द रूग्ण यांना प्रवास करणे धोकादायक आहे़ डांबर उखडले गेल्यामुळे उडत असलेली धुळ, माती याचा सामना करावा लागतो़ रस्त्याच्या दुरूस्तीचा प्रश्न प्रशासनाने लवकरात लवकर सोडवावा़
- प्रल्हाद सोनार, शिक्षक
अनेक महिन्यांपासून शिरपूर-शहादा मार्गाची बिकट दुरवस्था झाली आहे़ प्रवाशी व वाहन चालकांना या खड्डेमय रस्त्यावरून माती व धुळीचा सामना करावा लागत आहे़ रस्त्यावर खड्यांचे साम्राज्य असल्याने रस्त्यात खड्डे की खड्डयांत रस्ता हेच समजत नाही़
- सुनिल पाटील, शिक्षक