धुळे - कोरोना काळात सेवा बजावलेल्या कोरोना योध्द्यांचे एक महिन्याचे मानधन थकले आहे. तसेच कंत्राट संपल्याने बेरोजगारीची वेळ त्यांच्यावर आली आहे. कराराचे नूतनीकरण करून पुन्हा सेवेत घेऊन कायम करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
जिल्ह्यातील कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने कोविड केअर सेंटर रिकामी झाली आहेत. त्यामुळे तेथे कंत्राटी तत्त्वावर नोकरी बजावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कराराचे नूतनीकरण करण्यात आलेले नाही. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाल्याने कोविड केअर सेंटरमधील रुग्णांची संख्या शून्यावर आली आहे. दोंडाईचा येथील कोविड केअर सेंटर वगळता शिंगावे, साक्री, सामोडे, शिंदखेडा येथील कोविड केअर केंद्रांत एकही रुग्ण दाखल नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे कंत्राट संपल्यानंतर त्यांना पुन्हा कामावर बोलावण्यात आलेले नाही. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अचानक वाढली होती. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांवरील ताण वाढून आरोग्य यंत्रणा कोलमडू लागली होती. त्यावेळी कोविड केअर केंद्रात कंत्राटी स्वरूपात कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. त्यांची नेमणूक तात्पुरत्या स्वरूपासाठी झाली होती. कोविडच्या संकटाच्या काळात सेवा बजावली असल्याने कायमस्वरूपी नोकरी मिळावी, अशी या कर्मचाऱ्यांची अपेक्षा आहे.
दरम्यान, ज्यावेळी पदभरती होईल तेव्हा या कर्मचाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ . संतोष नवले यांनी दिली.
अनेकांचे मानधन थांबले
१ कोरोनाच्या काळात काम केलेल्या बहुतेक कंत्राटी कर्मचाऱ्यांचे एक महिन्याचे मानधन थांबले आहे.
२ मार्च व एप्रिल महिन्याचे मानधन खात्यात जमा झालेले आहे. तसेच मे महिन्याचे मानधन मिळावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
३ कोरोनाच्या कठीण काळात काम केले असल्याने पुन्हा नोकरीत सामावून घ्यावे, अशी मागणी केली आहे.
४ नोकरी गेल्याने बेरोजगारीची वेळ कंत्राटी कर्मचाऱ्यांवर आली आहे. लसीकरणासाठी पुन्हा कामावर घ्यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
मान दिल्याने पोट नाही भरत
कोरोनाच्या काळात कोविड केअर सेंटरला सेवा बजावली आहे. मात्र कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाल्याने पुन्हा कंत्राट मिळाले नाही. तसेच एका महिन्याचे मानधन देखील मिळालेले नाही. कोरोनाच्या काळात सेवा दिली असल्याने पुन्हा नोकरीत सामावून घ्यायला हवे.
- भारती पावरा,
शिंदखेडा येथील कोविड केअर सेंटरमध्ये कोरोनाच्या काळात तीन महिने सेवा बजावली आहे. आतापर्यंत मार्च व एप्रिल या दोन महिन्यांचे मानधन मिळाले आहे. मे महिन्याचे मानधन मिळालेले नाही. तसेच कोरोना भत्ता देखील मिळालेला नाही. लसीकरणाच्या कामासाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करायला पाहिजे.
- पार्वती तडवी
कोरोनाच्या काळात आरोग्य केंद्रात काम केले आहे. मात्र एका महिन्याचे मानधन अद्याप मिळालेले नाही. तसेच कोरोनाबाधित रुग्ण कमी झाल्याने पुन्हा कामावर घेतलेले नाही. त्यामुळे बेरोजगारीची वेळ आली आहे. कोरोनाच्या कठीण काळात काम केले असल्याने कंत्राटाचे नूतनीकरण करावे.
- बिना पावरा
सध्या काम नाही, लसीकरणासाठी कामावर घ्या
कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला होता. त्यावेळी रुग्णवाढीचा भार सांभाळण्यासाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांची मदत घेण्यात आली. आता रुग्ण कमी झाल्याने त्यांची नोकरी गेली आहे. लसीकरणाच्या कामासाठी पुन्हा नोकरी मिळावी, अशी मागणी या कर्मचाऱ्यांनी केली आहे.
प्रतिक्रिया -
निधीची कोणतीही अडचण नाही. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी निधी देण्यात आलेला आहे. मानधन मिळाले नसल्याबाबतची माहिती घेतो. ज्यावेळी आरोग्य विभागातील पदभरती होईल, तेव्हा कोरोनाच्या काळात कर्तव्य बजावलेल्या कोरोना योध्द्यांना प्राधान्य दिले जाईल.
- डॉ. संतोष नवले, जिल्हा आरोग्य अधिकारी