मासिक पाळीत लस घेता येते का ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:38 IST2021-05-06T04:38:09+5:302021-05-06T04:38:09+5:30
धुळे : मासिक पाळीत लस घेण्याबाबत सोशल मीडियावर अफवांचे वादळ उठले आहे. मात्र अशा अफवांना बळी पडू नका, मासिक ...

मासिक पाळीत लस घेता येते का ?
धुळे : मासिक पाळीत लस घेण्याबाबत सोशल मीडियावर अफवांचे वादळ उठले आहे. मात्र अशा अफवांना बळी पडू नका, मासिक पाळीतही लस घेता येते असे स्त्रीरोगतज्ज्ञांचे मत आहे.
सध्या कोरोनाचे लसीकरण सुरै आहे. आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर, ज्येष्ठ नागरिकांसोबतच १८ वर्षावरील नागरिकांना कोरोनाची लस दिली जात आहे. लसीकरण करून घेणाऱ्यांमध्ये महिलांची संख्याही मोठी आहे. मात्र मासिक पाळीत लस घेण्यावरून सोशल मीडियात काही दिवसांपासून उलटसुलट चर्चा सुरु होत्या. मासिक पाळीत लस घेता येत नसल्याबाबतच्या अफवांचे पेव उठले आहे. मात्र मासिक पाळीत लस घेण्यास कोणतीही अडचण नसल्याचे स्त्रीरोगतज्ज्ञांचे म्हणणे आहे. मासिक पाळीत, पूर्वी किंवा मासिक पाळीनंतर लस घेण्यास कोणतीही अडचण नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
प्रतिक्रिया -
मासिक पाळी सुरु असताना लस घेता येऊ शकते. मासिक पाळीत लस घेता येत नसल्याची माहिती चुकीची आहे. सध्या १८ वर्षावरील नागरिकांचेही लसीकरण सुरु झालेले आहे. त्यामुळे कोणत्याही अफवांना बळी न पडता महिलांनी लस घेण्यासाठी पुढे यावे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जास्तीत जास्त लसीकरण होणे महत्त्वाचे आहे.
- डॉ. पल्लवी रवंदळे, स्त्रीरोगतज्ज्ञ, मनपा
मासिक पाळीत लसीकरण केल्यास कोणताही दुष्परिणाम होत नाही. समाजमाध्यमांवर याबाबत पसरवलेले गैरसमज चुकीचे आहेत. मासिक पाळीमध्ये, पाळीनंतर किंवा आधीही लस घेऊ शकतात. तसेच कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन दोन्ही लसी सारख्याच प्रमाणात उपयुक्त आहेत.
- डॉ. मिताली गोलेच्छा, स्त्रीरोगतज्ज्ञ, एसीपीएम महाविद्यालय
लसीकरणाबाबत केंद्र शासनाच्या गाईडलाईन काय सांगतात...
१ - मासिक पाळीच्या दरम्यान लस घेऊ शकतात. पाळीनंतर किंवा आधीही लस घेतली तरी चालते. लसीचा मासिक पाळीवर काहीही परिणाम होत नाही.
२- गर्भवती महिलांनी लस घेऊ नये असे केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये सांगण्यात आले आहे.
३- प्रसूतीनंतर स्तनपानादरम्यान कोरोनाची लस घेऊ नये अशा सूचना यंत्रणेने केल्या आहेत. त्यामुळे पुढील सूचना येईपर्यंत स्तनदा मातांनी लस घेऊ नये.
४ - लस घेतल्यानंतर वंध्यत्व येत नाही.