फागणे, अभाणपूर प्रकल्पातून मिळणार पिकांना पाणीपाटबंधारे विभागाचे नियोजन सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:23 IST2021-07-19T04:23:23+5:302021-07-19T04:23:23+5:30

धुळे जिल्ह्यातील लघु पाटबंधारे योजना फागणे, ता. धुळे, अभाणपूर, ता. शिरपूरअंतर्गत धरण, अधिसूचित नदी, नाले यांच्या पाण्याचा लाभ देण्याचे ...

Irrigation department starts planning for crops to be obtained from Phagne, Abhanpur project | फागणे, अभाणपूर प्रकल्पातून मिळणार पिकांना पाणीपाटबंधारे विभागाचे नियोजन सुरू

फागणे, अभाणपूर प्रकल्पातून मिळणार पिकांना पाणीपाटबंधारे विभागाचे नियोजन सुरू

धुळे जिल्ह्यातील लघु पाटबंधारे योजना फागणे, ता. धुळे, अभाणपूर, ता. शिरपूरअंतर्गत धरण, अधिसूचित नदी, नाले यांच्या पाण्याचा लाभ देण्याचे नियोजित आहे. त्यामुळे बागायतदारांनी १ जुलै ते १४ ऑक्टोबर या कालावधीकरिता १ जुलैपासून सुरू झालेला खरीप हंगाम २०२१- २०२२ मध्ये भुसार, अन्नधान्ये, चारा, डाळी, कपाशी, भुईमूग व इतर हंगामी पिकांना पाण्याच्या उपलब्धतेनुसार पाणी अर्ज सादर करण्याची मंजुरी देण्याचे ठरविले आहे.

बागायतदार शेतकऱ्यांनी आपले नमुना क्रमांक ७, ७ (अ), (ब) चे पाणी अर्ज संबंधित शाखा कार्यालयात किंवा उपविभागीय कार्यालयात ३१ ऑगस्टपर्यंत सादर करावेत.

पाण्याच्या उपलब्धतेनुसार मंजुरी देण्यात येईल. बागायतदारांनी आपापल्या शेतचाऱ्या स्वच्छ व सुस्थितीत ठेवाव्यात. पाणी अर्ज स्वीकारण्याची मुदत पुरेशी देण्यात आलेली आहे. मुदतीनंतर आलेल्या पाणी अर्जाच्या मंजुरीबाबत उपलब्ध पाणीसाठा व अगोदर आलेली मागणी विचारात घेऊन नंतरच मंजुरी, नामंजुरीचा विचार करण्यात येईल. मंजुरी व पाणीपुरवठ्याबाबत अन्नधान्ये, भुसार, चारा पिकांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल. पाण्याचा रीतसर पास मिळाल्याशिवाय पाणी घेऊ नये. थकबाकीदारांनी मागील संपूर्ण थकबाकी व दरसाल दर शेकडा १० टक्के जादा आकारासह भरणे आवश्यक आहे.

टंचाई परिस्थितीत ऐन हंगामात पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित करावा लागल्यास पीक नुकसानभरपाई देता येणार नाही. विहित दिनांकापर्यंत पाणी अर्ज शाखा कार्यालय किंवा उपविभागीय कार्यालयास देऊन पोहोच पावती घेतली पाहिजे. शासनाने काही सवलती दिल्यास त्यांची जाहीर प्रकटनाद्वारे प्रसिद्धी करण्यात येईल. लाभक्षेत्रातील तसेच कालव्यापासून ३५ मीटर अंतराच्या हद्दीतील विहिरींबाबत नमुना ७ (ब) मागणी अर्ज न करता बिनअर्जी क्षेत्र भिजविण्यात आल्यास प्रचलित नियमानुसार पंचनामे करण्यात येतील. हस्तांतर झालेल्या पाणी वापर संस्थांना घनमापन पद्धतीने पाणी देण्यात येईल, असे पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले आहे.

...तर होणार कारवाई

पाणी नाश, पाळी नसताना पाणी घेणे, पाटमोट संबंध दूर न करणे वगैरे गुन्हे करणाऱ्या बागायतदारांचे नियमानुसार पंचनामे करण्यात येतील व दंडाच्या दराने आकारणी करण्यात येईल, असा इशारा पाटबंधारे विभागाने दिला आहे.

Web Title: Irrigation department starts planning for crops to be obtained from Phagne, Abhanpur project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.