कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लाॅकडाऊन व व्यवसायाला निर्बंध लागू करण्यात आल्याने अनेकांना व्यवसायात मोठा फटका बसला आहे. तर अनेकांना बेरोजगार देखील व्हावे लागले आहे. अशा परिस्थितीत सर्व जण अडचणीत सापडलेले असताना शाळा बंद असताना देखील पालकांना मुलांची शैक्षणिक फी भरावीच लागत आहे. ऑनलाईन शिक्षणामुळे संगणक किंवा स्मार्ट फोन, टॅबलेट अत्यावश्यकच झाले आहे. गोरगरीब पालकांची आर्थिक स्थिती नसताना मुलाचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी कसेबसे मोबाईल घेऊन दर महिन्याला इंटरनेटचा खर्च करावा लागत आहे. शिवाय अभ्यासक्रमाची सर्व पुस्तके आणि वह्या सुद्धा घ्याव्या लागत आहे.
महिन्याला होतो इंटरनेटसाठी चारशे खर्च
शाळा, महाविद्यालय बंद असल्याने मुलांना ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे. त्यामुळे कोरोना संसर्गामुळे शाळा बंद असून, विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे. यासाठी मोबाईल किंवा टॅबलेटवर इंटरनेट चालू ठेवावे लागते. महिन्याकाठी पालकांना इंटरनेटवर किमान चारशे रुपये खर्च करावे लागत आहेत. त्यातही ग्रामीण भागांत इंटरनेट सुविधा विस्कळीत असल्याने त्याचा फायदा होत नसल्याचे दिसते.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शिक्षण विभागाने शाळा, महाविद्यालय तसेच क्लास बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मुलांना ऑनलाईन शिक्षण बंधनकारक केले आहे. त्यासाठी मुलांना स्वतंत्र स्मार्ट फोन घ्यावा लागला. एका मोबाईलची किंमत किमान १० ते १२ हजार रूपये खर्च व दोनशे रूपयांचा रिचार्ज करावा लागतो.
-सुनीता पाटील, पालक
यंदाही कोरोनामुळे शाळा बंदच असून, विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे. मला दोन मुले आहेत. त्यांच्या ऑनलाईन क्लासची वेळ वेगवेगळी असली तरी ऑनलाईन अभ्यासक्रमासाठी मोबाईलमधील स्टोरेज स्पेस पुरत नाही. त्यामुळे दोन मोबाईल घ्यावे लागले आहेत.
-दीपक जाधव, पालक