ग्रामीण भागात भालदेव दैवताचे घरोघरी पूजन करून केले विसर्जन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:41 IST2021-09-15T04:41:17+5:302021-09-15T04:41:17+5:30
पोळानंतर येणाऱ्या दिवशी गोरज मुहूर्तावर भालदेवाची स्थापना करण्यात आली. भालदेव सात, नऊ व चौदा दिवसांचा कुटुंबातील परंपरेनुसार असतो. या ...

ग्रामीण भागात भालदेव दैवताचे घरोघरी पूजन करून केले विसर्जन
पोळानंतर येणाऱ्या दिवशी गोरज मुहूर्तावर भालदेवाची स्थापना करण्यात आली. भालदेव सात, नऊ व चौदा दिवसांचा कुटुंबातील परंपरेनुसार असतो. या काळात घरातील कुठलीही वस्तू कोणालाही दिली जात नाही. यात दानधर्म सुद्धा केला जात नसून घरातील कचरादेखील इतरत्र कुठेही न टाकता याकाळात भालदेवाच्या स्थापना केलेल्या ठिकाणावरच टाकत असतात. शेतकरी कुठलाही शेतीमाल घरातून बाजारात विक्रीसाठी घेऊन जात नसतात.
ओला भालदेव... कोरडा भालदेव...
घरात दुभती जनावरे असतील तर याकाळात दूध डेअरीवर अथवा विक्री न करता मुरण घातले जाते व विसर्जनाच्या दिवशी हे दही सर्वत्र गल्लीबोळात तसेच आप्तेष्टांकडे वाटप करतात. याला ओला भालदेव म्हणतात. दुभती जनावरे नसतील कोरडा.
विसर्जनाच्या एक दिवस आधी भालदेवाची सांजी काढून संपूर्ण घराची स्वच्छता केली जाते तर विसर्जनाच्या दिवशी जंगलातून लहू व रुचकीन यांची पाने, फुले आणून भालदेवाच्या स्थापनेवर ठेवून छोटासा जंगलाचा देखावा करून गुरे, गुराख्याची प्रतिकृती तयार करतात व दही भाताचा नैवेद्य दाखवून पूजा केली जाते. तर, माजघरात दुसऱ्या भालदेवाची स्थापना करून सात पुरणपोळ्यांचा नैवेद्य दाखवला जातो व मनोभावे पूजाअर्चा करून गोधनाचे स्वंरक्षण करण्याचे साकडे या देवाला घातले जाते. दुपारनंतर माजघरातील भालदेवाचे शेतात तर मुख्य दरवाजाच्या उजव्या कोपऱ्यावरील भालदेवाचे नदीपात्रात विसर्जन करण्याची पारंपरिक परंपरा आजही कायम असल्याची दिसून आली.
फोटो.. मालपूरसह ग्रामीण भागात पुरणपोळी व दही भाताचा नैवेद्य दाखवून भालदेव उत्सव साजरा करण्यात आला.