गौण खनिजाची बेकायदेशीर वाहतूक पकडली, दोन वाहने घेतली ताब्यात
By देवेंद्र पाठक | Updated: September 16, 2023 16:46 IST2023-09-16T16:46:14+5:302023-09-16T16:46:32+5:30
चालकाकडे चौकशी केली असता, कागदपत्रे नसल्याने दोन्ही वाहने तहसील कार्यालयाच्या आवारात जमा करण्यात आली.

गौण खनिजाची बेकायदेशीर वाहतूक पकडली, दोन वाहने घेतली ताब्यात
धुळे : धुळ्यातील अपर तहसील कार्यालयाचे पथक गस्तीवर असताना तालुक्यातील अवधान आणि मोहाडी परिसरात गौण खनिजाची बेकायदेशीर वाहतूक करणारी दोन वाहने शनिवारी सकाळी पकडण्यात आली. त्यात एक ट्रक आणि एक डंपर आहे. चालकाकडे चौकशी केली असता, कागदपत्रे नसल्याने दोन्ही वाहने तहसील कार्यालयाच्या आवारात जमा करण्यात आली.
अवैध गौण खनिजाची बेकायदेशीररीत्या होणारी तस्करी उघडकीस आणण्याकरिता धुळे अपर तहसील कार्यालयातील अपर तहसीलदार विनोद पाटील, मंडळ अधिकारी पंडित दावळे, सागर नेमाणे, कमलेश बाविस्कर, महसूल सहायक नाना गवळी यांचे पथक सकाळी गस्त घालत होते. त्यांना अवधान शिवारात ओव्हरलोड वाळूने भरलेला ट्रक दिसून आला. चालकाकडे चौकशी केली असता, त्याच्याकडे रॉयल्टी भरल्याची कोणतीही पावती आढळून आली नाही. परिणामी चालकास डंपर तहसील कार्यालयाकडे वळविण्याच्या सूचना करण्यात आल्या. त्यानुसार, डंपर धुळे अपर तहसील कार्यालयात आणण्यात आला.
तसेच यावेळी पथकाला मोहाडी पोलिसांतही मुरूमने भरलेला डंपर निदर्शनास आला. पथकाने डंपरचालकाकडे रॉयल्टीबाबत कागदपत्रांची विचारणा केली; मात्र चालकाकडे रॉयल्टी भरल्याची कोणताही पावती आढळून आली नाही. हे वाहन देखील अपर तहसील कार्यालयात जमा करण्यात आले. त्यांची चौकशी केली जात असून, विहित मुदतीत कागदपत्रे सादर करण्याची सूचना करण्यात आली आहे. कागदपत्रे सादर न केल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.