शहरातील वाढणारे खड्डे ठरताय जीवघेणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 22:20 IST2019-11-21T22:20:29+5:302019-11-21T22:20:52+5:30
महापालिका : वर्दळीच्या रस्त्यांची होतेय दयनीय अवस्था, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नाराजीचा सूर

शहरातील वाढणारे खड्डे ठरताय जीवघेणे
धुळे : शहरातील वर्दळीच्या रस्त्यांवर खड्यांचे साम्राज्य पसरले आहे़ आमदार डॉ़ फारुक शाह यांनी बैठक घेऊन पंधरा दिवसात खड्डे बुजविण्याचे आदेश दिले होते़ वेळोवेळी याकडे लक्ष देखील वेधण्यात आले़ परंतु खड्डे बुजण्यासंदर्भात कोणत्याही प्रकारचे ठोस पाऊल उचलल्याचे दिसत नाही़ परिणामी खड्डामधून वाहन नेताना नाराजीचा सूर वाहनधारकांकडून व्यक्त केला जात आहे़
शहरातील खड्डे कधी बुजविणार या आशयाचे वृत्त लोकमतने प्रकाशीत करुन प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला होता़ परिणामी पंचवटी परिसरातील अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याजवळील खड्डे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले़ सद्यस्थितीत हेच काम अर्धवट सोडून दिल्याचे समोर येत आहे़ वाडीभोकर रोड, लेनिन चौक, पोलीस मुख्यालयाजवळील रस्ता यासह ठिकठिकाणी आजही खड्ड्यांचे साम्राज्य पसरलेले दिसते़ वाहनधारकांकडून याबद्दल वेळोवेळी नाराजी देखील व्यक्त करण्यात आलेली आहे़ निधी मिळून देखील याकडे का दुर्लक्ष केले जाते? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे़
मोठ्या अपघातानंतर लक्ष देणार का?
शहरातील लेनिन चौक आणि पोलीस मुख्यालयाजवळील रस्ता तसेच बारा पत्थर भागात आणि अन्य ठिकाणी रस्त्यावर मोठे आकारचे खड्डे पडलेले आहे़ यातून वाहन गेल्यानंतर अपघात होण्याचा धोका वाढलेला आहे़ रात्रीच्या वेळेस तर हमखास अपघात होऊ शकतो, अशी स्थिती निर्माण झाली आहे़ वेळोवेळी लक्ष वेधून देखील प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होताना काही दिसत नाही़ महापालिकेच्या सभांमधून सुध्दा खड्यांचा हा विषय चर्चेत आलेला आहे़ यावर तात्पुरत्या स्वरुपात चर्चा होते़ मात्र, ठोस उपाययोजना होताना काही दिसत नाही़ रस्त्याची दुरुस्ती होत नाही की खड्डे बुजविले जात नाही, अशी स्थिती असताना दरवर्षी लाखों रुपयांचा निधी नेमका खर्च होतो कुठे? असा प्रश्न उपस्थित होतोय़