शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 13:52 IST2019-11-05T13:52:15+5:302019-11-05T13:52:26+5:30
पावसामुळे अर्थचक्र बिघडले : आॅक्टोबरमध्ये ७७ हजार ६२५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान, ७१५ गावे बाधित

dhule
शिरपूर : जिल्ह्यात परतीच्या पावसाचा शेती पिकांना मोठा फटका बसला असून, शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घासही हिरावून नेला आहे. आॅक्टोबरमध्ये झालेल्या पावसामुळे ७१५ गावातील अंदाजे ७७ हजार ६२५ हेक्टरवरील पिके व फळबागांचे नुकसान झाले आहे़ सततच्या या स्थितीमुळे ‘लढतोय, पण कणा मोडतोय’ अशीच व्यथा बळीराजाकडून व्यक्त होत आहे़
गेल्यावर्षी कमी पावसामुळे खरीप व रब्बी हंगाम शेतकºयांच्या पदरी पडला नव्हता़ त्यामुळे २०१९ मध्ये तरी वरूणराजा प्रसन्न होणार का, अशी विवंचना शेतकºयांना लागली होती़ तालुक्यात जून ते आॅगस्ट या तीन महिन्यापर्यंत पाऊस होवूनही धरणे कोरडीच होती़
करवंद व अनेर मध्यम प्रकल्पात पाण्याचा अल्प साठा होता़ तसेच तालुक्यातील १३ पैकी ८ लघु प्रकल्पात पाण्याचा ठणठणाट होते़ त्यामुळे कोरडा दुष्काळाला सामोरे जाण्याची भिती वाटत होती़ मात्र आॅगस्ट महिन्याच्या मध्यावर पावसाने जोरदार हजेरी लावून कहरच केला़ आॅक्टोबर महिन्यात सर्व धरणे ‘ओव्हर फ्लो’ झाली. पावसाला आता बास म्हणण्याची वेळ आलीय तरी देखील परतीच्या पावसाची जोरदार हजेरी सुरु आहे.
परतीच्या पावसाने शहरासह तालुक्यात हजेरी लावल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले आहे़ पिक कापणीला आले असतांना अधिकच्या पावसामुळे त्यास झाडावरच कोंब फुटू लागले़ काढणीला आलेल्या ज्वारी, मका, बाजरी, कापूस पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले़ त्यामुळे होत्याचे नव्हते झाल्यामुळे शेतकरी अधिकच संकटात सापडला़ कापसाचे उत्पन्न देखील आले नाही. बहुतांश शेतकºयांनी कपाशीवर केलेला फवारणी, खते, बियाणे यांचा खर्च देखील निघाला नसल्याचे सांगण्यात आले़
सततच्या पावसामुळे बाधीत झालेल्या शेती पिके व फळपिकाच्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल सादर करण्यात आला आहे़
त्यात खरीप ज्वारी ४८१० हेक्टर, बाजरी ५६३५, मका ६९६५, भुईमूग २४०, सोयाबीन ९०२०, कापूस ३९७८०, भाजीपाला ६५, पपई ११० असे एकूण ७७ हजार ६२५ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे़ खरीप २०१९ मधील एकूण पेरणी क्षेत्र १ लाख ११ हजार ४२२ हेक्टर पैकी ७७ हजार ६२५ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे़ त्यात बाधित शेतकरी संख्या १ लाख ६ हजार ६७७ इतकी आहे़