धुळे - राज्यपाल आले अन् जादू झाली.. असाच काहीसा प्रकार शहरातील संतोषी माता चौकातील रस्त्याबाबत झाला आहे. संतोषी माता चौकात ठिकठिकाणी खड्डे पडले होते. मात्र त्याच्या डागडुजीकडे मागील काही महिन्यांपासून दुर्लक्ष होत होते. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी धुळे जिल्ह्यात आल्यानंतर मात्र या रस्त्याचे नशीब फळफळले आहे. बुधवारी रात्रीतून चौकातील रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे गोंदूर विमानतळावर आगमन झाले. त्यानंतर महापालिकेतील कोरोना योद्धांच्या सत्काराच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. महापालिकेतील कार्यक्रम आटोपल्यानंतर थोड्यावेळासाठी गुलमोहर या शासकीय विश्रामगृहात ते थांबले होते. राज्यपाल गुलमोहर या शासकीय विश्रामगृहात येणार असल्याने गुरुवारी रात्रीच या चौकात डांबरीकरण करण्यात आले. गुरुवारी सकाळी या चौकातून जाणाऱ्या लोकांना रस्त्याचे काम कधी झाले? हा प्रश्न पडला होता. चौकातील खड्डे बुजण्यात आले असले तरी जवळच असलेल्या साक्री रोडवरील खड्डे मात्र कायम आहेत. राज्यपाल महोदयांच्या ताफा साक्री रोड वरून गेला असता तर इथले खड्डेही बुजले गेले असते, अशा प्रतिक्रिया साक्री रोड परिसरातील नागरिकांमध्ये उमटत आहेत.
राज्यपाल आले अन् जादू झाली ....
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:07 IST