माहेरची ओढ असलेल्या मुलींना सासरीच साजरी करावी लागणार आखाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:36 IST2021-05-13T04:36:12+5:302021-05-13T04:36:12+5:30
ग्रामीण भागात आजही अक्षय तृतीया सणाला विशेष महत्त्व आहे. पूर्वी अनेक कुटुंबामध्ये एकत्र पद्धती होती. त्यामुळे सासरी गेलेली मुलगी ...

माहेरची ओढ असलेल्या मुलींना सासरीच साजरी करावी लागणार आखाजी
ग्रामीण भागात आजही अक्षय तृतीया सणाला विशेष महत्त्व आहे. पूर्वी अनेक कुटुंबामध्ये एकत्र पद्धती होती. त्यामुळे सासरी गेलेली मुलगी दिवाळी व आखाजीला हमखास माहेरी येते. बदलत्या काळानुसार एकत्र कुटुंब पद्धती काही प्रमाणात कमी झालेली असली तरी सासरी गेलेली मुलगी आपल्या माहेरी आखाजीला हमखास जात असते. मात्र गेल्यावर्षाप्रमाणे यावर्षीही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. हा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी कडक निर्बंध लावलेले असून, जिल्हाबंदीही करण्यात आलेली आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या बाहेर असलेल्या सासुरवाशिणींना यावर्षीही या सणाला आपल्या माहेरी येता येणार नाही.
दरम्यान ग्रामीण भागात या दिवशी पूर्वजांचे स्मरण करण्यात येते. ही परंपरा कायम राहणार आहे. आखाजीनिमित्त अनेक ठिकाणी झोके बांधण्यात आलेले आहेत. त्यामुळे झोके घेळण्याचा आनंदही अनेक महिला घेण्याची शक्यता आहे.दरम्यान या दिवशी अनेक ठिकाणी पत्त्यांचे डाव रंगत असतात. यातून लाखोंची उलाढाल होत असते. मात्र कोरोनाचे कडक निर्बंध असल्याने, यावर्षी पत्त्याचे डाव रंगण्याची शक्यता कमीच आहे.
साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदीलाही प्राधान्य दिले जाते. मात्र आता सध्या सकाळी ११ वाजेपर्यंतच दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी असल्याने, खरेदीवरही मर्यादा येईल. त्यामुळे बाजारातील उलाढालही कमी होण्याची शक्यता आहे.