हट्टी बुद्रुक येथून पकडला गावठी कट्टा, एक ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 22:28 IST2018-05-14T22:28:58+5:302018-05-14T22:28:58+5:30
न्यायालयीन कोठडी : एक जण फरार

हट्टी बुद्रुक येथून पकडला गावठी कट्टा, एक ताब्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
निजामपूर : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि निजामपूर पोलीस यांनी संयुक्तपणे कारवाई करत गावठी कट्टा बाळगण्याच्या संशयावरुन एकास शहरानजिक महिंदळे शिवारातून पकडले़ त्याची चौकशी केली असता हट्टी बुद्रुक ता़ साक्री येथून गावठी कट्टा लपविल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली़
शहरानजिक महिंदळे येथील संशयित संतोष सरदारसिंग पिंपळसे याच्याकडे गावठी बनावटीचे पिस्टल विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली़ याप्रकरणी संतोष पिंपळसे याला गावात जावून ताब्यात घेण्यात आले़ त्याच्याकडे पिस्टल मिळाली नाही़ त्याची चौकशी केली असता त्याने साक्री तालुक्यातील हट्टी बुदु्रक येथील त्याच्या नातेवाईकाच्या घरी पिस्टल लपवून ठेवली असल्याचे सांगितल्यानंतर पोलिसांनी ती पिस्टल जप्त केली आहे़
हट्टी येथील अमृत पावबा बोरसे हा संतोष पिंपळसे याचा मेहुणा आहे़ घटना घडल्यानंतर तो फरार झाला आहे़ निजामपूर पोलिसात सोमवारी गुन्हा दाखल झाला़ तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल पाटील करीत आहेत़ पिंपळसेला न्यायालयीन कोठडी देण्यात आली़