अखेर त्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यास दरमहा १० हजार रुपये देण्याचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:32 IST2021-01-22T04:32:44+5:302021-01-22T04:32:44+5:30
शिंदखेडा तालुक्यातील चिरणे ग्रामपंचायतीत भालचंद्र भावसार हे शिपाई म्हणून कार्यरत होते. २०१४ मध्ये ते सेवानिवृत्त झाले. कामगार वेतन कायदा ...

अखेर त्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यास दरमहा १० हजार रुपये देण्याचा निर्णय
शिंदखेडा तालुक्यातील चिरणे ग्रामपंचायतीत भालचंद्र भावसार हे शिपाई म्हणून कार्यरत होते. २०१४ मध्ये ते सेवानिवृत्त झाले. कामगार वेतन कायदा २०१६ नुसार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वेतनवाढीसह फरकाची रक्कम देण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यानुसार वेतनाचा फरक मिळावा यासाठी भावसार यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने ग्रामपंचायतीला वेतनातील फरकाची रक्कम ८१ हजार १२० रुपये व २०१४ ते १६ पर्यंतचे १२ टक्केपर्यंतचे व्याज देण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर भावसार यांना २०१७ ते १९ पर्यंतच्या कालावधीत १ लाख २५ हजारापैकी केवळ ३५ हजार रुपये देण्यात आले होते. उर्वरित रक्कम देण्यास ग्रामपंचायतीकडून टाळाटाळ केली जात होती. फरकाची रक्कम मिळावी म्हणून त्यांनी शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजविले. मात्र उपयोग झाला नाही. अखेर त्यांनी २६ जानेवारी रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते.
या वृत्तामुळे सुस्त असलेली शासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली. १९ रोजी शिंदखेडा गटविकास अधिकारी यांच्या दालनात जिल्हा परिषद सदस्या संजीवनी सिसोदिया, उत्तम मनोहर चौधरी, ज्ञानेश्वर बाळकृष्ण जोशी, भालचंद्र भावसार, जगदीश बागूल, ग्रामपंचायत सदस्य प्रताप महाजन, रवी शिसोदे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. बैठकीत चिरणे ग्रामपंचायतीने सेवानिवृत्त शिपाई भालचंद्र भगवान भावसार यांना दरमहा १० हजार रुपये देण्याचे लेखी आश्वासन दिले. अशी उर्वरित एकूण रक्कम द्यायची आहे. त्यामुळे भालचंद्र भावसार यांनी आत्महदहन स्थगित केले आहे. तसेच त्यांनी ‘लोकमत’चेही आभार मानले आहेत.