धरण, तलावांमध्ये पोहणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:38 IST2021-05-21T04:38:10+5:302021-05-21T04:38:10+5:30

धुळे : धरण, तलावांत पोहण्यातून काही वेळेस दुर्घटना घडतात. अशा दुर्घटना टाळण्यासाठी धरण, तलावात पोहणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करावेत. तसेच ...

File charges against those who swim in dams, lakes | धरण, तलावांमध्ये पोहणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करा

धरण, तलावांमध्ये पोहणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करा

धुळे : धरण, तलावांत पोहण्यातून काही वेळेस दुर्घटना घडतात. अशा दुर्घटना टाळण्यासाठी धरण, तलावात पोहणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करावेत. तसेच या भागात नागरिकांच्या माहितीसाठी जलसंपदा विभागाने फलक प्रदर्शित करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष संजय यादव यांनी दिले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात आज सकाळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची नैसर्गिक आपत्ती व कोविड व्यवस्थापनाबाबत तसेच अन्य विषयांचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी श्री. यादव हे अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी महागनरपालिकेचे आयुक्त अजिज शेख, उपवनसंरक्षक एम. एम. भोसले, अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता श्री. पवनीकर, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय गायकवाड, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता वर्षा घुगरी, उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे (धुळे), डॉ. विक्रम बांदल (शिरपूर) आदींसह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

जिल्हाधिकारी यादव म्हणाले, जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू असून कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात आली आहे. कोरोनाबाधित रुग्णांची गृहविलगीकरणाची सुविधा बंद करण्यात आली आहे. आता कोरोना विषाणूबाधित रुग्णांचे गाव पातळीवरच विलगीकरण करण्यात येणार आहे. त्याचे नियोजन ग्राम पातळीवरील आपत्ती व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून करावयाचे आहे. या विलगीकरण कक्षांमध्ये पाणी, वीज, स्वच्छता आदी मूलभूत सोयी सुविधांची पूर्तता करावी.

पावसाळ्यास लवकरच सुरुवात होणार आहे. पावसाळ्यातील दुर्घटना टाळण्यासाठी प्रत्येक विभागाने दक्षता बाळगावी. तसेच समन्वयातून कामे करावीत. नदी, नाले काठावरील अनधिकृत बांधकामे संबंधित यंत्रणांनी तातडीने हटवावीत. तालुका, ग्रामपातळीवरील आराखडे अद्ययावत करून त्याचा अहवाल सादर करावा. नदी, तलाव, धरण परिसरात काही वेळेस तरुण पार्टीसाठी एकत्र येतात. अशा व्यक्तींवरही कारवाई करावी. त्यासाठी तलाव, धरण परिसरात सुरक्षा रक्षक तैनात करावेत. निगराणीसाठी सीसीटीव्ही लावावेत. जलसंपदा विभागाने धरणातून पाणी सोडण्यापूर्वी नदीकाठावरील गावांना सतर्क करावे. धरणातील जलसाठ्याची अद्ययावत माहिती दररोज सादर करावी.

पावसाळ्यात साथीचे आजार पसरण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे आरोग्य यंत्रणांनी सतर्क राहावे.

औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करून घ्यावा. शुद्ध पाण्याचा पुरवठा होईल, असे नियोजन करावे. सर्प प्रतिबंधक लसीचा पुरेसा साठा उपलब्ध करून ठेवावा. आपत्ती निवारण्यासाठी आवश्यक साधनसामग्रीची यादी करून ती तपासून घ्यावी. आवश्यकतेनुसार मॉक ड्रील करून घ्यावे. मंडळ व धरणांवरील पर्जन्यमापक यंत्रे अद्ययावत असल्याची खात्री करून घ्यावी. प्रत्येक विभागाने स्वतंत्र नियंत्रण कक्ष कार्यान्वित करून त्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाला द्यावी. तसेच हा कक्ष २४ तास कार्यान्वित राहील, अशी दक्षता घ्यावी.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ते, पुलांची पाहणी करून आवश्यक त्या दुरुस्त्या कराव्यात. पाणी जमा होणाऱ्या ठिकाणी उपाययोजना कराव्यात. पावसाळ्यात वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी वीज वितरण कंपनीने पथके गठीत करावीत. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने शाळांची तपासणी करून घ्यावी. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. आपत्ती व्यवस्थापनासाठी आवश्यक मनुष्यबळाचे आरोग्य विभागाने तातडीने लसीकरण करून घ्यावे, अशाही सूचना जिल्हाधिकारी यादव यांनी दिल्या.

निवासी उपजिल्हाधिकारी गायकवाड, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेंद्र सोनवणे यांनी आपत्ती व्यवस्थापन आराखड्याची सविस्तर माहिती दिली.

Web Title: File charges against those who swim in dams, lakes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.