खताच्या भावात ५० टक्के विक्रमी वाढ, मार्केटमधून जुना स्टॉक गायब!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:35 IST2021-05-16T04:35:00+5:302021-05-16T04:35:00+5:30
शिंदखेडा : खताच्या प्रत्येक ५० किलोच्या बॅगमागे ६०० ते ७०० रुपये अशी अचानक विक्रमी ५० टक्के वाढ केल्याने ...

खताच्या भावात ५० टक्के विक्रमी वाढ, मार्केटमधून जुना स्टॉक गायब!
शिंदखेडा : खताच्या प्रत्येक ५० किलोच्या बॅगमागे ६०० ते ७०० रुपये अशी अचानक विक्रमी ५० टक्के वाढ केल्याने मार्केटमधून जुने खत गायब झाले आहे. वाढीव खताबाबत कोणतेच राजकीय पक्ष आवाज उठवायला तयार नसल्याने शेतकरी या खताच्या भाववाढीमुळे शेती करावी की सोडून द्यावी अशी स्थिती शेतकऱ्यांपुढे निर्माण झाली असून, यामुळे मोठा उद्रेक होण्याची दाट शक्यता आहे.
शेतकरी आधीच कोरोनाने व लॉकडाऊनने हैराण झाला आहे. त्याने पिकविलेल्या शेतमालाला कवडीमोल भाव मिळत आहे. त्यात खते कंपन्यांनी अचानक प्रत्येक बॅगमागे ५० टक्के भाववाढ केली आहे. शेतमालाची या पद्धतीने कधीच वाढ झाली नाही. उलट यावर्षी फळ पिके शेतकऱ्यांनी हजारो रुपये खर्च करून पिकविली. मात्र, भाव नसल्याने व काढणीचा खर्चही निघेनासा झाल्याने सर्व फळ पिकांत गुरे सोडली. शासनाने ठरवून दिलेल्या हमीभावापेक्षाही कमी किमतीत कडधान्य व इतर पिके विकली जात आहेत. त्यात खताच्या किमतीत अचानक ५० टक्के एवढी विक्रमी वाढ केल्याने शेतकरी हवालदिल झाला असून, शेती करावी की नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. पूर्वी डीएपी खत १२०० रु. प्रतिबॅग मिळत होते ते नवीन रेटनुसार १९०० रुपयांना मिळणार आहे, तसेच नवीन रेटनुसार पोट्याश १००० रु, १२x२६x२६ रुपये १७७५ /-, १२x३२x१६ खत रुपये १८०० /-, १६x१६x१६ खत १४०० रुपये, अशी विक्रमी भाववाढ केली आहे. म्हणून व्यापाऱ्यांनी ही नवीन रेटच्या कमी प्रमाणात खताची मागणी केली आहे.
सदरचे वाढीव रेट हे व्यापाऱ्यांना एक महिना अगोदरच दिले होते. मात्र, नंतर कंपनीने व्यापाऱ्यांना पत्र पाठवून चुकीचे रेट पाठविले गेल्याचे म्हटले होते, असे एका व्यापाऱ्याने खाजगीत सांगितले. कारण गेल्या महिन्यात तीन-चार राज्यांच्या निवडणुका होत्या. त्यामुळेच तर खताची भाववाढ रोखली होती की काय, अशी चर्चाही आता सुरू झाली आहे.