गरीब, मोलमजुरी करणाऱ्यांचीही आखाजी झाली गोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:34 IST2021-05-15T04:34:39+5:302021-05-15T04:34:39+5:30
शिक्षकांनी केले दीड क्विंटल आंबे वाटप शिंदखेडा तालुक्यातील पढावद येथील दोन शिक्षकांनी सामाजिक जाणिवेतून आदिवासी वस्तीत आंब्यांचे वाटप केले ...

गरीब, मोलमजुरी करणाऱ्यांचीही आखाजी झाली गोड
शिक्षकांनी केले दीड क्विंटल आंबे वाटप
शिंदखेडा तालुक्यातील पढावद येथील दोन शिक्षकांनी सामाजिक जाणिवेतून आदिवासी वस्तीत आंब्यांचे वाटप केले आहे. गावातील आदिवासी वस्तीतील ८० घरांतील कुटुंबांना दीड क्विंटल आंबे वाटप करून कोरोनाकाळात आदिवासींची अक्षय्यतृतीया गोड केली.
पढावद गावातील रहिवासी असलेले शिक्षक राजेंद्र धोंडू पवार व चंद्रकांत मूलचंद पवार यांनी कोरोनाच्या काळात आदिवासी बांधवांना मदत करावी असे ठरविले. अक्षय्यतृतीयेनिमित्त आदिवासी वस्तीत प्रत्येक घरात या दोन्ही शिक्षकांनी आंबे वाटप केले. त्यामुळे आनंद आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावर दिसत होता. यावेळी देविदास पवार, नाना पाटील, हुकूम पवार, चंपालाल पवार, योगराज पवार, अशोक पवार, राजू अहिरे, विनोद खंडारे, ऋषिकेश गुजर, राजेंद्र पवार, चंद्रकांत पवार यांच्या हस्ते आंबे वाटप करण्यात केले.
पिंपळनेरात पुरणपोळीचे भोजन
पिंपळनेर - येथील संभाजी अहिरराव यांनी रमजान महिन्यात मुस्लिम समाजातील गरजू कुटुंबाला फळे व किराणा मालाचे वाटप केले. आज अक्षय्यतृतीया व रमजान ईद हे दोन्ही सण एकत्र आल्याने ‘एक हात मदतीचा’ ही संकल्पना आजही पाहावयास मिळाली. शिवभोजन केंद्रावर पुरणाची पोळी, खीर, पापड, रश्शी भात असे मोफत जेवण देण्यात आले. जेवणानंतर राजे शिवछत्रपती इंग्लिश स्कूलचे संचालक शामशेठ कोठावदे यांच्या हस्ते फळांचेही वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
विद्यार्थ्यांनी केले आंब्याचे भाटपुरा येथे वाटप
भाटपुरा येथील रहिवासी असलेल्या हंसराज चौधरी या विद्यार्थ्याने गावातील आदिवासी बांधवांच्या घरी आंब्यांचे वाटप केले.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून हंसराज चौधरी नेहमी सामाजिक कार्यक्रम करीत असतो. यातूनच हंसराज चौधरी याला आपल्या गावातील आदिवासी बांधवांना अक्षय्यतृतीयेनिमित्त आंब्याचे वाटप करण्याची कल्पना सुचली. यानंतर कोणतीही वाट न बघता त्यास घरच्यांनी २ क्विंटल आंबे घेऊन दिले. भाटपुरा गावातील आदिवासी भागातील प्रत्येक घरात या आंब्यांचे वाटप करण्यात आले. आदिवासी वस्तीतील जवळपास १३० ते १४० घरांत हे आंबे वाटप करण्यात आले. याबद्दल आदिवासी भागातील आदिवासी बांधवांनी मोठा आनंद व्यक्त केला.
आदिवासी वस्तीत आंबे वाटप करतेवेळी प्रशांत चौधरी, माजी सरपंच शैलेंद्र चौधरी, आर्किटेक्ट राज सोनवणे, आप्पा भिल, संजय भिल, युवराज भिल, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे हंसराज चौधरी, हर्ष साळुंखे, पवन राजपूत, लोकेश महाजन, आदी उपस्थित होते.