सांगवीजवळ स्पिरीटचे आठ ड्रम शिताफीने जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 22:19 IST2019-05-17T22:19:28+5:302019-05-17T22:19:52+5:30
शिरपूर : १० लाख ७० हजारांचा मुद्देमाल हस्तगत, चालक फरार

सांगवीजवळ स्पिरीटचे आठ ड्रम शिताफीने जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर : मुंबई-आग्रा महामार्गावरील हाडाखेड तपासणी नाक्यावरील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथक पहाटेच्या सुमारास गस्त घालीत असतांना सांगवी गावाजवळ गस्तच्या गाडीला पाहताच स्पिरीट वाहून नेणाºया वाहन चालकाने वाहन सोडून पळ काढल्याची घटना घडली़ वाहनासह १० लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़
शुक्रवारी पहाटे ६ वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली़ राज्य उत्पादन शुल्क विभागाचे येथील निरीक्षक व्ही़ बी़ पवार, दुय्यम निरीक्षक राजेश जाधव, एस़ पी़ कुटे, शांतीलाल देवरे, गोरख पाटील, केतन जाधव, रामचंद्र चौरे यांचे पथक महामार्गावर गस्त घालीत असतांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून सांगवी शिवारातील आंबा-खामखेडा रस्त्यावर संशयित वाहन क्रमांक एमएच १८ एए ५०२ जात होते़ या वाहनाचा गस्तीवरील पथक पाठलाग करत असतांना संबंधित चालकाला संशय आल्यामुळे त्याने वाहन थांबवून पळ काढला़
त्यामुळे पथकाने वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये विनापरवाना स्पिरीटचे (शुध्द मद्यार्क) २०० लिटर क्षमतेचे ८ प्लॉस्टिक ड्रम पूर्णपणे भरलेले व ७ ड्रम २०० लिटर क्षमतेचे रिकामे स्पिरीट वासाचे असा दारूबंदी गुन्ह्याचा मुद्देमाल विनापरवाना वाहतूक करीत असतांना मिळून आला़
९५ हजार रूपयांचे स्पिरीट व ९ लाख ७५ हजार रूपयांच्या वाहनासह एकूण १० लाख ७० हजार रूपयांचा मुद्देमाल या कारवाईत जप्त करण्यात आला आहे़