ट्रक पलटी झाल्याने चालकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 19:56 IST2019-05-13T19:55:14+5:302019-05-13T19:56:13+5:30
पिंपळपाडा रोड : सहचालक बचावला

ट्रक पलटी झाल्याने चालकाचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : साक्री तालुक्यातील पिंपळपाडा रोडवर भरधाव वेगात असलेला ट्रक पलटी झाला़ यात चालकाचा जागीच मृत्यू ओढवला़ तर, या अपघातात मात्र सहचालक थोडक्यात बचावला आहे़ त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत़ अपघाताची ही घटना रविवारी सायंकाळी घडली़
साक्री तालुक्यातील पश्चिम पट्यातील पिंपळपाडा ते चावडीपाडा या दरम्यान तीव्र वळण आहे़ या वळणावर तडकेश्वर ता़ मांडवी जि़ सुरत (गुजरात) येथील जीजे १० टीव्ही ७२७२ क्रमांकाचा ट्रक विटाभट्टीसाठी लागणारा दगडीकोळसा चावडीपाडा येथील जयंतीभाई यांच्या गोडावूनवर खाली करुन मांडवी तालुक्यातील तडकेश्वरकडे परतत होता़ पिंपळपाडा ते चावडीपाडा दरम्यानच्या तीव्र वळणावर ट्रक पलटी झाला़ या वाहनाचा चालक काशीराम सुक्करभाई वसावा (२८, रा़ तडकेश्वर, ता़ मांडवी, जि़ सुरत) याचा ट्रकखाली दाबला गेल्याने जागीच मृत्यू ओढवला आहे़ तर सहचालक किरीट कालिदास रावळ (३७, रा़ तडकेश्वर, ता़ मांडवी, जि़ सुरत) याच्या पायाला किरकोळ दुखापत झाली आहे़ सुदैवाने त्याचा जीव वाचला आहे़ त्याला तात्काळ पिंपळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले़ उपचारानंत त्याला घरी सोडून देण्यात आले़ अपघाताची माहिती परिसरातील लोकांनी पोलिसांना दिल्यानंतर पिंपळनेर पोलीस ठाण्याचे प्रकाश सोनवणे, राजाराम खैरनार, शरद चौरे हे घटनास्थळी दाखल झाले़ या अपघाताची फिर्याद नोंदविण्यात आल्याने भादंवि कलम ३३७, ३०४ (अ), ४२७ व मोटार वाहन कायदा १८४ अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे़ सहायक पोलीस निरीक्षक पंजाबराव राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रविंद्र रणधीर घटनेचा तपास करीत आहेत़