दोंडाईचा नगरपालिका निवडणुकीत द्विसदस्यीय पद्धतीचा अपक्षांना बसणार फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:39 IST2021-09-26T04:39:13+5:302021-09-26T04:39:13+5:30
राज्य निवडणूक आयोगाने २५ ऑगस्टला प्रभागरचनेचा आराखडा करण्याचे आदेश दिले होते. मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम व त्यांची टीम प्रभागरचनेचा ...

दोंडाईचा नगरपालिका निवडणुकीत द्विसदस्यीय पद्धतीचा अपक्षांना बसणार फटका
राज्य निवडणूक आयोगाने २५ ऑगस्टला प्रभागरचनेचा आराखडा करण्याचे आदेश दिले होते. मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम व त्यांची टीम प्रभागरचनेचा आराखडा तयार करण्याचा कामाला लागली होती. एका प्रभागात दोन उमेदवार निवडून द्यावे लागणार आहेत. ज्या उमेदवार कार्यकर्त्याकडे विकासाची दृष्टी, पक्षाचा किंवा गटाचा पाठिंबा, मतदारांशी चांगला संबंध, चांगले सामाजिक काम असेल तोच उमेदवार निवडून येणार आहे. त्यामुळे अपक्ष उमेदवार निवडून येण्याची शक्यता कमी असल्याने घोडेबाजार थांबण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे नगरपालिकेत पक्षीय वर्चस्व वाढणार आहे .
दोंडाईचा नगरपालिकेची पंचवार्षिक निवडणूक २०११ च्या जनगणनेनुसार होणार आहे. १२ प्रभागांत २४ नगरसेवक निवडून येतील.
महाविकास आघाडी शासनाने घेतलेल्या बहुसदस्यीय निर्णयाचे कायद्यात रूपांतर होऊन तो निर्णय जारी केला जाईल. पालिका प्रशासनाने एकसदस्यीय पद्धतीनुसार वाॅर्डरचनेचा आराखडा तयार केला होता.आता तो नव्याने द्विसदस्यीय आराखडा तयार होणार आहे.
दरम्यान, दोंडाईचा नगरपालिकेची २७ नोव्हेंबर २०१६ ला २४ जागांसाठी पंचवार्षिक निवडणूक झाली होती. त्यात माजी मंत्री व आमदार जयकुमार रावल यांच्या नेतृत्वाखाली भाजपला बहुमत मिळाले होते. सद्य परिस्थितीत माजी मंत्री, आमदार जयकुमार रावल यांच्या वर्चस्वाखाली असलेल्या नगरपालिकेत भाजपचे २१, माजी आमदार डॉ. हेमंत देशमुख यांचा काँग्रेसचे २ व मनसेचा १ असे २४ नगरसेवक आहेत, तर भाजपचे ३ स्वीकृत नगरसेवक आहेत. दोंडाईचा नगरपालिकेत भाजपचाच लोकनियुक्त नगराध्यक्षा नयनकुवर रावल कार्यरत आहेत.
आगामी दोंडाईचा नगरपालिका निवडणुकीत १२ प्रभागांतून द्विसदस्यीय पद्धतीने २४ नगरसेवक निवडून येतील. नगराध्यक्ष नगरसेवकांतून निवडून येईल. गतवेळी २१ डिसेंबर २०१६ ला नगराध्यक्षा नयनकुवर रावल यांनी पदभार स्वीकारला होता. दरम्यान, द्विसदस्यीय पद्धतीचे कायद्यात रूपांतर, ओबीसी जागाचा असलेला तिढा बघता ही निवडणूक जानेवारी किंवा फेब्रुवारी २०२२ मध्ये होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.