रमजान सणाबाबत जिल्हा प्रशासनाचे आदेश जारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:35 IST2021-05-13T04:35:59+5:302021-05-13T04:35:59+5:30

धुळे : कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी मुस्लिम बांधवांनी पवित्र रमजानचा सण सार्वजनिक ठिकाणी एकत्र न येता घरात साजरा करीत ...

District administration issues order regarding Ramadan | रमजान सणाबाबत जिल्हा प्रशासनाचे आदेश जारी

रमजान सणाबाबत जिल्हा प्रशासनाचे आदेश जारी

धुळे : कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी मुस्लिम बांधवांनी पवित्र रमजानचा सण सार्वजनिक ठिकाणी एकत्र न येता घरात साजरा करीत ‘ब्रेक द चेन’ या आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे, असे आदेश जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष संजय यादव यांनी दिले आहेत.

यावर्षी १३ एप्रिलपासून मुस्लिमधर्मियांच्या पवित्र रमजान महिन्यास प्रारंभ झाला असून १३ किंवा १४ मे (चंद्रदर्शनावर अवलंबून) रोजी रमजान ईद (ईद उल्‌ फित्र) साजरी केली जाणार आहे.

रमजान ईदकरिता मुस्लिम बांधवांनी नियमित नमाज पठण, तरावीह तसेच इफ्तारसाठी मशिदीमध्ये अथवा सार्वजनिक ठिकाणी एकत्र न येता सर्व धार्मिक कार्यक्रम आपापल्या घरातच साजरे करून 'ब्रेक द चेन' आदेशाचे काटेकोर पालन करावे. नमाज पठणाकरिता मशिदीत तसेच मोकळ्या जागेत एकत्र येऊ नये. निर्धारित वेळेच्या व्यतिरिक्त बाजारामध्ये सामान खरेदीकरिता गर्दी करू नये किंवा एकत्र जमू नये. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया दंडसंहिता कलम १४४ लागू असल्याने तसेच रात्रीची संचारबंदी असल्यामुळे संचारबंदीच्या कालावधीत फेरीवाल्यांनी रस्त्यावर स्टॉल लावू नयेत. तसेच नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर फिरू नये. रमजान ईदनिमित्ताने कोणत्याही प्रकारे मिरवणुका, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक अथवा राजकीय कार्यक्रमांचे आयोजन करू नये. धार्मिक स्थळे बंद असल्याने मुस्लिम समाजातील धर्मगुरू, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते आणि स्वयंसेवी संस्थांनी पवित्र रमजान ईद साधेपणाने साजरी करण्याच्या अनुषंगाने जनजागृती करावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करणारी व्यक्ती, संस्था अथवा संघटना महाराष्ट्र काेविड १९ उपाययोजना नियम २०२० च्या नियम ११ नुसार भारतीय दंडसंहिता (४५ ऑफ १८६०) कलम १८८ मधील तरतुदीनुसार व आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५, फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ आणि साथरोग अधिनियम १८९७ मधील तरतुदीप्रमाणे फौजदारी कारवाईस पात्र राहील, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.

Web Title: District administration issues order regarding Ramadan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.