Digambara..Digambara..Sripad Vallabh Digambara! | दिगंबरा..दिगंबरा..श्रीपाद वल्लभ दिगंबरा!
Dhule

धुळे : जिल्हाभरातील श्री दत्त मंदिर व श्री स्वामी समर्थ केंद्रात श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त बुधवारी श्री दत्त जन्मोत्सव कार्यक्रम, पालखी मिरवणूक, कीर्तनासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दिवसभर भाविकांची दर्शनासाठी रिघ लागलेली दिसून आली.
खर्दे येथे पालखी व यात्रोत्सव
शिरपूर- तालुक्यातील गुजर खर्दे येथे श्री दत्त जयंतीनिमित्त ११ रोजी श्री दत्तांच्या मूर्तीची पालखी मिरवणूक काढण्यात आली. यात भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दिवसभर भाविकांची दर्शनासाठी गर्दी सुरु होती. दरम्यान, येथे श्री दत्त जयंतीनिमित्त यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. येथे श्री दत्तांची एकमुखी मुर्ती असून मंदिर प्राचीन आहे़ बुधवारी पहाटे श्रीमद् भगवद्गीता पारायण, मूर्तीस मंगलस्रान, आरती, भजनाने यात्रोत्सवास सुरूवात करण्यात आली. सायंकाळी चार वाजता परंपरागत पध्दतीने गावातून तगतराव मिरवणूक काढण्यात आली. रात्री सवाद्य पालखी मिरवणूक सोहळा पार पडला. यावेळी भाविकांनी गुलालाची उधळण करीत पुष्पवृष्टी केली. त्यानंतर रात्री मनोरंजनासाठी शालीक शांताराम यांचा लोकनाट्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात्रेनिमित्त मंदिर परिसरात खेळणी, संसारोपयोगी साहित्य, विविध खाद्य पदार्थासह मिठाईची दुकाने व्यावसायिकांनी थाटली आहेत. मनोरंजनासाठी आकाश पाळणेही होते. भाविकांनी दर्शन व यात्रोत्सवासाठी मोठी गर्दी केली होती.
श्री स्वामी समर्थ केंद्रात उद्या सांगता
शिरपूर- शहरातील सरस्वती कॉलनीतील दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ केंद्रात ५ डिसेंबरपासून अखंड नाम जप यज्ञ कार्यक्रम सुरु आहे़ ११ रोजी बली, पूर्णाहूती दुपारी १२़३९ वाजता श्रीदत्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला. १२ रोजी सकाळी १०़३० वाजता सप्ताहाचा समारोप होऊन महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे़
थाळनेर व विखरण येथे जन्मोत्सव
शिरपूर- थाळनेर व विखरण येथील त्रिकाल आरती केंद्र व वरूळ, भटाणे, वाघाडी, अर्थे, कुरखळी, दहिवद, भाटपुरा, होळनांथे, जापोरा, सांगवी, मांजरोद आणि बभळाज या साप्ताहिक केंद्रावर श्री दत्त जन्मोत्सवासह विविध कार्यक्रम झाले़
कुरखळी येथे जन्मोत्सव
शिरपूर- कुरखळी येथील श्री दत्त मंदिरात श्री दत्त याग, श्री गुरूचरित्र पारायण व कीर्तन कार्यक्रम सुरु होते. बुधवारी श्री दत्त जयंतीनिमित्त दत्त जन्मोत्सवाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
शिरपूरच्या श्री दत्त मंदिरात गर्दी
शिरपूर- शहरातील जनता नगरातील श्री दत्त मंदिरात बुधवारी श्री दत्त जन्मोत्सवासह विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. याप्रसंगी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. शहरातील मारवाडी गल्लीतील श्री दत्त मंदिरासह येथील बसस्थानकावरील श्री दत्त मंदिरातही जन्मोत्सव साजरा करण्यात आला. येथेही भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.
मोहाडी उपनगरात पालखी
धुळे- मोहाडी उपनगरातील द्वारकाधीश श्रीकृष्ण मंदिरात श्री दत्त जयंतीनिमित्त ११ रोजी सकाळी ८ वाजता श्री दत्त पालखी मिरवणूक काढण्यात आली. सकाळी १० वाजता ध्वजारोहण, अनुशरण, धर्मसभेचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी १२ वाजता महाआरती उपहार, नैवेद्य अर्पण होऊन दुपारी १ ते ३ वाजेदरम्यान महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
शिंदखेडा येथे श्री दत्त जन्मोत्सव
शिंदखेडा- येथील श्री दत्त मंदिरात ११ रोजी सायंकाळी श्री दत्त जन्मोत्सव व कीर्तन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी श्री दत्त मूर्ती मंगलस्नान, लघुरुद्राभिषेक करण्यात आले. सायंकाळी प्रा.नाना महाराज नरडाणेकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम झाला. तसेच श्री दत्त जन्मोत्सव, महाआरती आदी कार्यक्रम पार पडले. दर्शनासाठी दिवसभर गर्दी सुरु होती.
न्याहळोद येथे पालखी
न्याहळोद- येथील श्री दत्त मंदिरात श्री दत्त जयंतीनिमित्त बुधवारी सकाळी रुद्राभिषेक, पालखी सोहळा, दुपारी महाप्रसाद व रात्री ८ वाजता ह.भ.प. पांडुरंग आवारकर यांच्या कीर्तन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
श्री गुरुकृपा धाममध्ये कार्यक्रम
धुळे- पारोळारोडवरील प.पू.श्री. राघवदास स्वामी राघवानंद सुरदास श्री शरद महाराज ब्रह्मचारी समाधी मंदिरात ११ रोजी श्री दत्त जयंतीनिमित्त सकाळी ७ ते ९ श्री दत्त अभिषेक व समाधी अभिषेक पूजन, १० वाजता हभप सुरेश महाराज फागणेकर यांचे प्रवचन झाले. दुपारी १२ ते ४ महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला.
चैतन्यधाम येथे सत्संग
धुळे- येथील चैतन्यधाम संत श्री आसाराम आश्रमात श्री योग वेदांत सेवा समितीतर्फे ११ रोजी श्री दत्त जयंतीनिमित्त सकाळी १० वाजता अनुराधा दिदी यांच्या सत्संगाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

Web Title: Digambara..Digambara..Sripad Vallabh Digambara!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.