महाराष्टÑ केसरी स्पर्धेतील धुळ्याचा शिलेदार....!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 13:10 IST2020-01-12T13:10:24+5:302020-01-12T13:10:58+5:30
हर्षल गवते याची कास्यं पदकाची कमाई

Dhule
धुळे : महाराष्ट्र केसरी स्पर्धेत जवळपास २० वर्षांच्या कालावधीनंतर धुळे जिल्ह्याला पदक मिळवून देण्याची कामगिरी हर्षल घनश्याम गवते या पहेलवानाने केली आहे.
हर्षल घनश्याम गवते याला सागर या नावानेही ओळखले जाते. लहानपणापासून कुस्तीची आवड असलेल्या हर्षल याने यंदा झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत ८६ किलो वजन गटात कांस्य पदकाची कमाई केली. धुळे जिल्ह्याला हा मान सुमारे २० वर्षांनंतर मिळाला. रामदास व्यायाम शाळेचा मल्ल असलेला हर्षल याच्यात असलेले कुस्तीचे कौशल्य हे तसे अनुवंशिकच म्हणावे लागेल. त्याचे वडील घनश्याम गवते हे आपल्या काळात एक प्रसिद्ध मल्ल होते. त्यानंतर हर्षलचा मोठा भाऊ धीरज याने देखील अनेक दंगली गाजवल्या आहेत. तसेच त्याने शालेय आणि इतर स्पर्धांमध्ये देखील चांगली कामगिरी केली. त्याला खेळाडू कोट्यातून पोलीस दलात नोकरी देखील मिळाली.
वडील आणि मोठ्या भावाच्या पावलावर पाऊल टाकत धाकट्या हर्षल याने रामदास व्यायाम शाळेत कुस्तीचे धडे गिरवायला सुरुवात केली. वडील घनश्याम गवते यांनी त्याला कुस्तीचे धडे दिले. त्यानंतर त्याने पाचवीत असताना विविध आंतरशालेय कुस्ती स्पर्धांमध्ये सहभागी व्हायला सुरूवात केली. त्याने सातत्याने त्यात यश मिळवले. २०११ मध्ये तो राष्ट्रीय शालेय कुस्ती स्पर्धेत ४६ किलो गटात देखील सहभागी झाला होता. त्यात त्याने कांस्य पदक मिळवून आपल्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी त्याला कुस्तीच्या प्रशिक्षणासाठी पुण्यात क्रीडा प्रबोधिनीला पाठवले. मात्र तेथे काही महिने सराव करून तो लगेचच भरत निकाले यांच्याकडे एक वर्षे सराव आणि प्रशिक्षण घेतले. त्याचाच फायदा त्याला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत झाला.
हर्षल याने आंतरशालेय कुस्ती स्पर्धेत दोन कांस्य, दोन रौप्य आणि एका सुवर्ण पदकाची कमाई केली.
२०१४ मध्ये क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या पायका राष्ट्रीय स्पर्धेत देखील त्याने ४६ किलो गटात कांस्य पदक पटाकवले होते. याच वर्षी त्याने यवतमाळमध्ये झालेल्या राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत १७ वर्षाआतील गटात कांस्य पदकाची कमाई केली होती.
गेल्या दहा वर्षातील त्याची ही सातत्यपूर्ण कामगिरी कुस्तीगिरांना नक्कीच प्रेरणादायी ठरेल.