बीडीच्या थोटकावरून दरोडा, चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा धुळे पोलिसांनी केला पर्दाफाश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2021 12:05 IST2021-01-27T12:05:03+5:302021-01-27T12:05:54+5:30
दोन जणांना अटक, आरोपींकडून मुद्देमाल हस्तगत

बीडीच्या थोटकावरून दरोडा, चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा धुळे पोलिसांनी केला पर्दाफाश
धुळे- बीडीच्या थोटकावरून दरोडा, चोरी करणाऱ्या आंतरराज्य गुन्हेगार टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला असून, या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आलेली आहे. आरोपींनी सामोडे (ता. साक्री) तसेच बाभळे (ता.शिंदखेडा) येथे केलेल्या धाडसी चोरीची कबुली दिली आहे. तर आरोपींनी तीन लाख ३० हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सामोडे (ता. साक्री) येथे १३ जानेवारी २०२१ रोजी पाच शस्त्रधारी दरोडेखोरांनी शरद दयाराम शिंदे यांच्या घरात प्रवेश करून शरद शिंदे यांच्यासह त्यांची पत्नी व मुलाला रिव्हॉलव्हरचा धाक दाखवून रोख रक्कम, सोने-चांदीचे दागिने असा एकूण ८ लाख ८७ हजार रूपयांचा ऐवज लंपास केला होता. याप्रकरणी पिंपळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच बाभळे (ता.शिंदखेडा) येथील एका कंपनीतून वेगवेगळ्या कंपनीच्या ६६ इलेक्ट्रीक मोटारींची चोरी झालेली होती.
याा गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखा धुळे मार्फत समांतर तपास सुरू होता. दोनही ठिकाणच्या घटनास्थळी पोलिसांना बीडीचे अर्धवट जळालेली थोटके दिसून आली. त्यामुळे दोनही गुन्हे एकाच टोळीने केले असावेत असा अंदाज पोलिसांनी काढला. याप्रकरणी पोलिसांनी २६ रोजी संशयित रोहीत कैलास चव्हाण (१९, रा. बावडीया, देवास,मध्यप्रदेश) व अब्दुल सलाम अब्दुल मोमीन शेख (२७, रा.भैसाना,ता. राणीगंज,उत्तरप्रदेश ह.मु. पूर्व हुडको काॉलनी, धुळे) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांनी बाभळे व सामोडे येथे चोरी केल्याची कबुली दिली आहे. या गुन्हेगारांविरूद्ध देवास, इंदूर, उज्जैन, धुळे, मुंबई, येथे वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक चिन्मय पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या पथकाने केलेली आहे.