धुळ्यात 'रात्रीस खेळ चाले...' : विधिमंडळाच्या आमदारांच्या समितीतील सदस्यांसाठी ठेवले साडेपाच कोटी; रेस्ट हाऊसमध्ये सापडले घबाड!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 10:31 IST2025-05-22T10:30:01+5:302025-05-22T10:31:01+5:30
माजी आमदार अनिल गोटे यांच्या आरोपानंतर खोली क्रमांक १०२ उघडली अन्...

धुळ्यात 'रात्रीस खेळ चाले...' : विधिमंडळाच्या आमदारांच्या समितीतील सदस्यांसाठी ठेवले साडेपाच कोटी; रेस्ट हाऊसमध्ये सापडले घबाड!
धुळे : येथील शासकीय विभागांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी अभ्यास दौऱ्यावर आलेल्या आमदारांच्या समितीतील सदस्यांना देण्यासाठी गुलमोहर शासकीय विश्रामगृहाच्या १०२ क्रमांकाच्या खोलीत साडे पाच कोटी रुपये ठेवल्याचा आरोप धुळ्याचे माजी आमदार तथा उद्धव सेनेचे नेते अनिल गोटे यांनी केल्यानंतर रात्री उशीरा जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या एक कमिटीने या रुमचे कुलूप तोडून इन कॅमेरा तपासणी केली.
रुममध्ये नोटा मोजण्याचे मशिन देखील नेण्यात आले होते. एक तासहून अधिक वेळ रुममध्ये सापडलेल्या नोटांची मोजणी सुरू होती, असे समजते. मात्र, रुममधून कुणीही बाहेर न आल्याने यासंदर्भात दुजोरा मिळालेला नाही.
धुळ्यात बुधवारी सकाळी समितीचे ११ आमदार दाखल झाले आहेत. या समितीत सहभागी असलेल्या आमदारांना देण्यासाठी अधिकाऱ्यांनी साडे पाच कोटी रुपये गोळा केले असून ते विश्रामगृहाच्या १०२ क्रमांकाच्या खोलीत ठेवले आहेत असा आरोप बंद खोलीबाहेर ठिय्या मांडून बसलेल्या माजी आमदार अनिल गोटे यांनी प्रसार माध्यमासमोर केला होता. रात्री ११ वाजेच्या सुमारास प्रातांधिकारी रोहन कुवर, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता आर. आर. पाटील, उद्धव सेनेचे नरेंद्र परदेशी आणि कॅमेरामन माळी अशा पाच लोकांच्या कमिटीने रुमचे कुलूप तोडून इन कॅमेरा तपासणी सुरु केली. काही वेळानंतर रुममध्ये नोटा मोजण्याचे मशिन नेण्यात आले. एक तासापेक्षा अधिक काळापासून रुममध्ये सापडलेल्या नोटांची मोजणी सुरू होती, असे समजते.
धुळ्यात दौऱ्यावर आलेले आमदार.... -
अभ्यास दौऱ्यासाठी २९ लोकप्रतिनिधी २१ मे रोजी धुळ्यात येणार होते. परंतू सोमवारी सकाळी फक्त ११ सदस्य आले. त्यात समिती प्रमुख आमदार अर्जुन खोतकर, आमदार काशिराम पावरा, दिलीप बोरसे, मंदा म्हात्रे, मनिषा चौधरी, किशोर पाटील, किरण सामंत, शेखर निकम, कैलास पाटील, सदाशिव खोत, राजेश राठोड यांच्यासह विधीमंडळाचे अवर सचिव (समिती) दामोदर गायकर यांचा समावेश होता.
अनिल गोटे बाहेर बसूनच ...
रुममध्ये इन कॅमेरा तपासणी सुरु असताना अनिल गोटे हे रुमच्या बाहेर विश्रामगृहाच्या बाहेर खुर्चीवर बसून होते. त्यांच्यासोबत उद्धवसेनेचे महानगरप्रमुख धीरज पाटील, जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे यांच्यासह त्यांचे समर्थक ठाण मांडून बसले होते.
तब्बल पाच तास ठिय्या आंदोलन... अनिल गोटे सायंकाळी सहापासून आंदोलनाला बसले होते. प्रशासनाची समिती रात्री ११ वाजता शासकीय विश्राम गृहावर आली. त्यानंतर रुममध्ये इन कॅमेरा तपासणी सुरु होती.