कोरोना रिकव्हरीत धुळे प्रथम, नंदुरबार शेवटून दुसरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 12:10 IST2020-12-12T12:10:18+5:302020-12-12T12:10:33+5:30

९६ टक्के रुग्ण झाले कोरोनामुक्त, रुग्ण दुपटीचा दरही वाढला

Dhule first in Corona Recovery, Nandurbar second | कोरोना रिकव्हरीत धुळे प्रथम, नंदुरबार शेवटून दुसरे

dhule

धुळे : कोरोना रिकव्हरी अर्थात बरे झालेल्या रुग्णांमध्ये धुळे जिल्ह्याने राज्यात पुन्हा पहिला क्रमांक पटकावला आहे. जिल्ह्यातील सर्वाधिक ९६. ३७ टक्के रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीतही मोठी वाढ झाली आहे.
रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ४९६ दिवसांवर पोहोचला आहे. तसेच जिल्ह्याचा मृत्युदर प्रथमच राज्याच्या मृत्युदरापेक्षा कमी झाला आहे. शेजारील नंदुरबार जिल्ह्याची मात्र कोरोना मुक्तीमध्ये घसरगुंडी उडाली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील ८९ टक्के रुग्ण बरे झाले आहेत. कोरोनामुक्त जिल्ह्यांच्या यादीत नंदुरबारनंतर भंडारा शेवटच्या स्थानावर आहे.
राज्याचा एकूण मृत्युदर २. ५७ टक्के इतका आहे. नोव्हेंबरअखेरपर्यंत धुळ्याचा मृत्युदर राज्यापेक्षा जास्त होता. आता मात्र २.२६ टक्के इतका झाला आहे.
रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी जळगाव जिल्ह्याचा सर्वाधिक आहे. जळगावचा रुग्ण दुपटीचा कालावधी ९५६ दिवस इतका आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव थांबण्यासाठी कोरोनामुक्तीचा दर व रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीत वाढ होणे महत्त्वाचे मानले जाते. जिल्ह्याची दोन्ही बाबींमध्ये वाढ झाल्यामुळे दिलासा मिळाला आहे.
प्रशासनाच्या सामूहिक प्रयत्नांमुळे कोरोनाविरुद्ध लढ्यात जिल्ह्याची चांगली कामगिरी राहिली आहे. जिल्हाधिकारी संजय यादव, हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एम.पी. सांगळे, जिल्हा कोरोना नोडल अधिकारी डॉ. विशाल पाटील, हिरे महाविद्यालयाचे अति विशेष अधिकारी डॉ. दीपक शेजवळ, डॉ. निर्मलकुमार रवंदळे, डॉ. मनीष पाटील व डॉ. माधुरी सूर्यवंशी कोरोना लढ्यातील प्रमुख शिलेदार ठरले आहेत.

Web Title: Dhule first in Corona Recovery, Nandurbar second

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.