अतुल जोशी।आॅनलाइन लोकमतधुळे : ‘बालपण देगा देवा...’ असे आपण नेहमी म्हणतो. कारण बालपणीचा काळ सुखाचा आणि आनंदाचा असतो. ना कसली चिंता ना कसली काळजी, मनसोक्त खेळायचे, आनंद लुटांयचा असा हा काळ असतो. पण हे सुखं मोजक्याच मुलांच्या नशिबात असतो. काही बालके बालवयातच शिक्षणाऐवजी मजुरी करीत परिवाराला आर्थिक हातभार लावतात. अशांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पामार्फत केले जाते. जिल्ह्यात २०१९-२० या शैक्षणिक वर्षात ४४६ विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यात आलेले आहे.भारताचे माजी पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस हा बालदिन म्हणून साजरा केला जातो. त्या पार्श्वभूमिवर जिल्ह्यातील बालकामगारांची शैक्षणिक स्थिती जाणून घेतली असता, कामगार कार्यालयातून वरील माहिती मिळाली.ज्या वयात शाळेत जावून शिकायचे, खेळायचे, बागडायचे त्या वयात विटा उचलायच्या, कचरा गोळा करायचा, शेतात काम करायचे अशी अनेक कामे बालकांना करावी लागतात. बालकामगारांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता शासनाच्या श्रम व रोजगार मंत्रालयाच्यावतीने जिल्हास्तरावर राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प राबविण्यात येतो. स्वयंसवी संस्थामार्फत दर तीन वर्षांनी ९ ते १४ वयोगटातील बालकामगारांचा शोध घेतला जातो. त्यांना दोनवर्षे बालकामगार प्रशिक्षण केंद्रात ठेवण्यात येते. याठिकाणी त्यांना तिसरी व चौथीच्या वर्गात दाखल करण्यात येते. या बालकांना प्राथमिक शिक्षणासोबतच व्यवसाय पुरक शिक्षण दिले जाते.जिल्ह्यात राष्टÑीय बाल प्रकल्पांतर्गत ४० शाळा मंजूर असून आता फक्त १८ शाळा कार्यरत आहेत. २०१९-२० या शैक्षणिक वर्षात जिल्ह्यात ४४६ बालकामगारांना शिक्षणाच्या प्रवाहात असल्याची माहिती राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पाचे प्रोग्राम अधिकारी देविदास बडगुजर यांनी दिली. एका विशेष प्रशिक्षण केंद्रात दोन प्राथमिक शिक्षक, एक लिपिक व एक शिपाई कार्यरत असतो. प्रशिक्षण केंद्रात दाखल झालेल्या प्रत्येक बाल कामगाराला दरमहा ४०० रूपये विद्यावेतन दिले जाते. दोन वर्षे प्रशिक्षण केंद्रात राहिल्यानंतर या विद्यार्थ्यांना वयानुरूप इतर खाजगी शाळांमध्ये दाखल करण्यात येत असते. त्याची जबाबदारी मात्र बालकामगारांच्या पालकावर असते. गेल्या १४ वर्षांपासून जिल्ह्यात या प्रकल्पाचे काम सुरू आहे. दरवर्षी प्रकल्पात दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असली तरी त्यांच्या गळतीचे प्रमाणही जास्त आहे. त्यामुळे मुख्य प्रवाहात राहणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होऊ लागली आहे. दरम्यान बालकामगार प्रथेच्या उच्चाटनासाठी प्रयत्न सुरू आहेत.
धुळे जिल्ह्यातील ४४६ बालकामगार शिक्षणाच्या प्रवाहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 11:31 IST