धुळ्याच्या नगरसेवकासह तिघांचा कसारा घाटात अपघातात मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 13:40 IST2018-09-14T13:33:12+5:302018-09-14T13:40:02+5:30
कुमार नगरात हळहळ : नातेवाईक घटनास्थळाकडे रवाना

धुळ्याच्या नगरसेवकासह तिघांचा कसारा घाटात अपघातात मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : भरधाव चारचाकीवरील नियंत्रण सुटल्याने चारचाकी उलटून धुळ्यातील तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास मुंबई-नाशिक महामार्गावरील कसारा घाटाजवळील घडली. या अपघातात दोन जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये धुळे महापालिकेतील काँग्रेसचे नगरसेवक कुमार डियालानी यांचा समावेश आहे़
धुळ्यातील कुमार नगरातील रहिवासी एमएच १८ एजे ७२२८ या क्रमांकाच्या कारने महामार्गावर धुळ्याकडून मुंबईकडे जात असताना शहापूर पोलिस ठाणे हद्दीतील आडगाव-पेंडरघोळजवळ वाहनावरील नियंत्रण सुटल्याने चारचाकी रस्त्याच्या कडेला उलटली. या अपघातात वाहन चालक ललितकुमार मनोहरलाल भारद्वाज (४७), राजू सुंदरदास भाटीजा (६८) व कुमार नरोत्तम डियालानी (५७) हे जागीच ठार झाले तर रमेश कुकरेजा यांच्यासह अन्य एक जण जखमी झाला. अपघातानंतर शहापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक महेश शेठे, सहाय्यक निरीक्षक गजेंद्र पालवे, भरत गांगुर्डे, अनिल नवाल यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना शहापूर (जि.ठाणे) येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ हलवले तर मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले़ घटनेची माहिती मिळताच धुळ्यातील कुमारनगरात हळहळ व्यक्त झाली़ मृताच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली आहे़