धुळे: भरधाव कारची उभ्या ट्रॅक्टरला धडक; चार वर्षांच्या चिमुरडीसह ५ जण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2022 00:22 IST2022-08-02T00:17:49+5:302022-08-02T00:22:04+5:30
शिरपूरहून कानुमातेचा कार्यक्रम आटोपून नाशिककडे जाताना घडली दुर्घटना, दोघांवर उपचार सुरू

धुळे: भरधाव कारची उभ्या ट्रॅक्टरला धडक; चार वर्षांच्या चिमुरडीसह ५ जण ठार
धुळे: शिरपूरहून कानुमातेचा उत्सव साजरा केल्यानंतर नाशिकच्या दिशेने भरधाव वेगाने जाणारी कार उभ्या असलेल्या ट्रॅक्टरवर जाऊन धडकली. या अपघातात कारमधील तिघे आणि ट्रॅक्टरजवळ उभा असणारा सफाई कामगार असे चार जणांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर दुर्दैवाने चार वर्षांच्या चिमुरडीचाही उपचारा दरम्यान मृत्यू झाला. एकूण पाच जणांच्या मृत्यूच्या बातमीने परिसरात खळबळ उडाली असून दोन जण गंभीर जखमी असून मृत्यूशी झुंज देत आहेत. त्यांच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
शिरपूरहून कानुमातेचा उत्सव साजरा केल्यानंतर नाशिकच्या दिशेने एक भरधाव वेगाने कार आली. कारचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रॅक्टरवर जाऊन धडकली. ही घटना नरडाणा गावाजवळील गव्हाणे फाट्यावर सोमवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास घडली. देवीदास धोंडू माळी (वय ५७, रा. सोनगीर, ता. धुळे), संदीप शिवाजी चव्हाण, त्यांची पत्नी मीना संदीप चव्हाण, गणेश छोटू चौधरी (सर्व रा. नाशिक) या चौघांचा जागीच मृत्यू झाला. तर मयत चव्हाण दाम्पत्याची मुलगी जान्हवी (वय ४) हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या दाम्पत्याचा मुलगा गणेश (वय ६) व दुसरी कन्या साक्षी (वय १०) हे दोघे रूग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत.