२ लाख १२ हजार पुस्तक संचाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:37 IST2021-05-19T04:37:21+5:302021-05-19T04:37:21+5:30
दरवर्षी जिल्हा परिषदेतील पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मराठी, इंग्रजी, उर्दू भाषेची पुस्तके मोफत देण्यात येत असतात. विद्यार्थी संख्येनुसार ...

२ लाख १२ हजार पुस्तक संचाची मागणी
दरवर्षी जिल्हा परिषदेतील पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मराठी, इंग्रजी, उर्दू भाषेची पुस्तके मोफत देण्यात येत असतात. विद्यार्थी संख्येनुसार या पुस्तकांची मागणी होत असते. धुळे जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ११०३ शाळा असून, त्यात सुमारे सव्वादोन लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना ही पुस्तके देण्यात येत असतात.
दरवर्षी सर्व शिक्षा अभियानांतर्गत ही पुस्तके दिली जात होती; मात्र आता पहिली ते बारावीपर्यंतचा समावेश समग्र शिक्षा अभियानात करण्यात आलेला असून, त्यांच्यामार्फतच ही पुस्तके मिळणार असल्याचे जिल्हा परिषदेतून सांगण्यात आले.
समग्र शिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना दरवर्षी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. ही पुस्तके जमा करून त्याचा पुनर्वापर करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. या योजनेला पालक व विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे. धुळे जिल्ह्यात सुमारे १९ हजार १५५ पुस्तके आतापर्यंत परत करण्यात आली. समग्र शिक्षा अभियानांतर्गत मोफत पाठ्यपुस्तके या उपक्रमाखाली सन २०१९-२०, व २०२०-२१ या वर्षी विद्यार्थ्यांना वाटप केलेली सुस्थितीतील पाठ्यपुस्तके शाळांमध्ये पुनर्वापरासाठी जमा करण्याचे आवाहन करण्यात आले होते. यासाठी सक्ती करण्यात आलेली नव्हती; मात्र या योजनेला धुळे जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद मिळाला. आतापर्यंत १९ हजार १५५ पुस्तके परत करण्यात आली. त्यात मराठीची १८ हजार ४५३, उर्दूची ५७२, इंग्रजीची १३० पुस्तकांचा समावेश आहे. राज्य प्रकल्प संचालक राहुल द्वेवेदी, जि. प. अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, शिक्षण सभापती मंगला पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी. व प्राथमिकचे शिक्षणाधिकारी मनीष पवार यांच्या आवाहनाला पालक व विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला आहे.