नारीशक्तीमुळे होतेय बलवान पिढीची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 23:24 IST2019-11-20T23:24:21+5:302019-11-20T23:24:39+5:30

मकरंद अनासपुरे : बचत गटांच्या सदस्यांसाठी आयोजित महिला प्रबोधन मेळाव्यात प्रतिपादन

The creation of a strong generation is due to femininity | नारीशक्तीमुळे होतेय बलवान पिढीची निर्मिती

Dhule

बोरकुंड : सक्षम आणि स्वयंपूर्ण नारीशक्तीला स्वत:च्या पायावर उभे करण्यातून बलवान पिढीचे नवनिर्माण होत आहे. ह्या अलौकिक कार्यात बोरकुंडसारख्या गावाने दिलेली आर्थिक, मानसिक, शारीरिक ताकद राज्यासाठी दीपस्तंभ ठरेल, असे प्रतिपादन नाम फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी येथे काढले. चूल आणि मूल ह्या चौकटीबाहेर असलेल्या विशाल जगाला कवेत घेण्यासाठी या परिसरातील नारीशक्ती सरसावली आहे, असे गौरवोदगारही त्यांनी काढले.
बोरकुंड येथे सावता महाराज मंगल कार्यालयात इंदूबाई प्रतिष्ठान व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) धुळे यांच्यातर्फे बुधवारी दुपारी महिला प्रबोधन मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.
सरपंच बाळासाहेब भदाणे व त्यांच्या इंदूबाई प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक करतांना विनोदात्मक शैलीत अभिनेते अनासपुरे म्हणाले की, बोरकुंडच्या महिलांना सक्षमतेने पुढे नेऊन बोरकुंडच्या नारीशक्तीला बाजारपेठ उभी करण्यासाठी सरपंच बाळासाहेब तत्पर राहतील मात्र महिलांनी पुढे येणे गरजेचे असल्याचे सांगितले.
यावेळी प्रमुख अतिथी मार्गदर्शक दौंड, पुणे येथील प्रसिद्ध उद्योजिका कमल परदेशी तसेच बार्शी, सोलापूर येथील उद्योजिका वैशाली आवारे, संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब भदाणे, सचिव शालिनी भदाणे, उमेद अभियानाचे जिल्हा व्यवस्थापक त्रिवेणी भोंदे, लुपिन फाउंडेशनचे विभागीय व्यवस्थापक योगेश राऊत, मार्गदर्शक रावण भदाणे, इंदूबाई भदाणे, डॉ.राजेंद्र भदाणे, बी.डब्ल्यू. आव्हाड, पतिंग भदाणे उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे आयोजक संस्थाध्यक्ष बाळासाहेब भदाणे म्हणाले ज्या गावात मी लहानाचा मोठा त्या गावाशी उपकाराची नाळ कायम रहावी म्हणून परिसरातील गरजा लक्षात घेवून विकासाचे सूक्ष्म नियोजन करत गावाचा लोकसहभागातून कायापालट करायचे ठरविले आहे महिला सक्षम झाल्या तर कुटुंब सक्षम होते. यातून बचत गटाच्या माध्यमातून महिलांना परिपूर्ण बनवायचे असल्याचे सांगितले. यावेळी उद्योजिका परदेशी, उद्योजिका आवारे यांनी महिलांनी कोणत्याही क्षेत्रात जिद्दीने पुढे जावे. बचत गटाच्या माध्यमातून महिलांना एकत्र करून त्यांना नेहमी सकारात्मक वाव द्यावा. तसेच मार्केटमध्ये काय पिकवितो, काय विकले जाते यास महत्व आहे. महिलांना मार्केटिंग करता येणे गरजेचे असल्याचे सांगितले.
यावेळी विविध मनोरंजनात्मक दाखले देत महिलांना हुंडा घेणाऱ्या मुलाशी लग्न करू नये, लग्नात साडया देणे-घेणे बंद करून आहेर पद्धती बंद करावी, असे सांगत आवारे यांनी प्रतिष्ठानचे कौतुक केले.

Web Title: The creation of a strong generation is due to femininity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे