भंगार बाजारात हाणामारी, दोन जण जखमी, वाहनांची तोडफोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 16:35 IST2019-06-04T16:34:50+5:302019-06-04T16:35:11+5:30
तणाव : मनपा विरोधी पक्ष नेते साबीर शेखसह १९ जणांवर गुन्हा

भंगार बाजारात हाणामारी, दोन जण जखमी, वाहनांची तोडफोड
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शहरातील भंगार बाजारात दोन गटात सोमवारी रात्री दंगल उसळली़ सशस्त्र जमावाने अक्षरश: धिंगाणा घातला़ दोघांवर खुनी हल्ला करत वाहनांची आणि दुकानांची तोडफोड झाली़ या घटनेमुळे तणावाची स्थिती निर्माण झाली़ घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांच्यासह पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला़ महापालिका विरोधी पक्षनेते साबीर शेख यांच्यासह १९ जणांविरुध्द आझादनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला़
शहरातील मौलवीगंज गल्ली नंबर १४ येथे राहणारे मोहम्मद आसिफ अहमद हाजी (५६) यांनी आझादनगर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली़ त्यानुसार, मोहम्मद आसिफ यांचा भाऊ आणि पुतण्या यांना झालेल्या मारहाणीचा जाब विचारल्याच्या कारणावरुन सोमवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास महापालिकेचे विरोधी पक्षनेते साबीर शेख यांचा मुलगा जुनेद, युसुफ तलाखान, रहेयान वसी खान, सामा वसीखान, शोएब लाला खान, ताहीर रहेमतुल्ला खान आणि त्यांच्या सोबतच्या १० ते १२ जणांनी हातात लाठ्या-काठ्या, लोखंडी सळई, रॉड घेऊन मोहम्मद आसीफ यांच्यावर हल्ला केला़ या हल्ल्यात त्यांच्यासह दोन जणं गंभीर जखमी झाले आहेत़ तसेच या टोळक्याने अन्सार नगर भागात झालेल्या दगडफेकीत ७ ते ८ दुचाकी ४ चाकी वाहने आणि शकील मेहंदी हसन यांच्या मालकीच्या एस़ एम़ टायर दुकानाची तोडफोड केली़
घटनेची माहिती कळताच पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस निरीक्षक दिनेश आहेर आणि पोलीस कर्मचाºयांचे पथक घटनास्थळी दाखल झाले़
याप्रकरणी मोहम्मद आसीफ अहमद हाजी आणि मुबस्सीर खान बरकतुल्लाह खान या दोघांनी परस्पर विरोधी तक्रार दिलेल्या आहेत़ याप्रकरणी महापालिकेचे विरोधी पक्ष नेते साबीर शेख यांच्यासह अन्य जणांविरुध्द हल्लाप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक दिनेश आहेर करीत आहेत़