दुचाकी अपघातात दाम्पत्य ठार, धुळे तालुक्यातील जुनवणे शिवारातील घटना
By देवेंद्र पाठक | Updated: April 15, 2023 17:25 IST2023-04-15T17:24:56+5:302023-04-15T17:25:42+5:30
अपघाताची ही घटना शुक्रवारी रात्री घडली.

दुचाकी अपघातात दाम्पत्य ठार, धुळे तालुक्यातील जुनवणे शिवारातील घटना
धुळे : धुळे ते चाळीसगाव रोड जुनवणे शिवारात भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाने पुढे चालणाऱ्या दुचाकीस धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील पती-पत्नी दुचाकीसह खाली पडले. त्या दोघांना गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. डाॅक्टरांनी तपासून मयत घोषित केले.
अपघाताची ही घटना शुक्रवारी रात्री घडली. धुळे येथील रवींद्र हिरामण तमखाने (वय ६१) आणि त्यांची पत्नी कल्पनाबाई रवींद्र तमखाने (५१) हे त्यांच्या दुचाकीने जात होते. चाळीसगाव रोडवरील जुनवणे गावाच्या शिवारात आश्रमशाळेजवळ पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीस जोरदार जोरदार धडक दिली. यात दुचाकीसह पती-पत्नी फेकले गेले. त्यांना गंभीर स्वरूपाची दुखापत झाली. त्यांना तातडीने हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. याप्रकरणी प्रशांत छगन भोई यांनी धुळे तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार, अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा तपास पोलिस उपनिरीक्षक कौठुळे करत आहे.