सांगवी प्राथमिक आरोग्य केंद्रावर गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:36 IST2021-05-13T04:36:19+5:302021-05-13T04:36:19+5:30
शिरपूर तालुक्यात कोरोना विषाणूने गत महिन्यात डोके वर काढले होते़. मार्च-एप्रिल या दोन महिन्यांत हजारापेक्षा अधिक बाधितांच्या संख्येबरोबर मृत्यूची ...

सांगवी प्राथमिक आरोग्य केंद्रावर गोंधळ
शिरपूर तालुक्यात कोरोना विषाणूने गत महिन्यात डोके वर काढले होते़. मार्च-एप्रिल या दोन महिन्यांत हजारापेक्षा अधिक बाधितांच्या संख्येबरोबर मृत्यूची संख्यादेखील वाढली होती़. या दोन महिन्यांत कोरोनाने चांगला कहर केला होता़; मात्र एप्रिलच्या अखेरीस बाधितांच्या संख्येबरोबर मृत्यूची संख्या घटत राहिली़. मे महिन्यात बाधितांच्या संख्येवर मोठ्या प्रमाणात अंकुश ठेवण्यात आरोग्य विभागाला यश आले़. त्यामुळे सद्यस्थितीत २६४ कोरोना बाधितांवर उपचार केले जात आहे़त. आतापर्यंत कोरोनाने १०३ जणांचा बळी घेतला आहे़. ५ हजार १७८ बाधितांनी उपचार करून कोरोनावर मात केली़. या तालुक्यात आतापर्यंत ५ हजार ३०३ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे़.
राज्यात कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू झाला आहे़. परंतु लस उपलब्धतेबाबत अनेक अडचणी येत आहेत़. शहरात उपजिल्हा रुग्णालयात ४५ वर्षांपुढील, तर शहरातील क्रांतिनगर व आऱसी़पटेल मेनबिल्डिंग येथे १८ वर्षावरील तरुणांना लस दिली जात आहे़. तसेच तालुक्यातील ८ प्राथमिक आरोग्य केंद्रांतदेखील ४५ वर्षांपुढील लोकांना लस दिली जात आहे़. होळनांथे, विखरण, वाडी, बोराडी येथील आरोग्य केंद्रांत १८ वर्षांपुढील युवकांना देखील लसीकरण केले जात होते़; मात्र लस टंचाईअभावी बुधवारपासून १८ वर्षांपुढील युवकांना लस देणे बंद केल्यामुळे आता ४५ वर्षांपुढील लोकांना व दुसरा डोस घेणाऱ्यांना प्राधान्याने ही लस दिली जात आहे़.
बुधवारी, सकाळपासून सांगवी येथील आरोग्य केंद्रात लोकांनी लसीकरणासाठी तोबा गर्दी केली़. लसीकरणाचे डोस कमी त्यापेक्षा दुप्पट-तिप्पट गर्दी आरोग्य केंद्राच्या परिसरात होती़. विशेषत: वृध्द पुरुष-महिला रांगेत उभे असतानादेखील त्यांना लस टंचाईअभावी रिकाम्या हाताने परतावे लागले़.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना लसीसाठी मात्र नागरिक गर्दी करीत गोंधळ घालत आहेत़. लसीच्या तुटवड्यामुळे नागरिक गर्दी करीत सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करीत नसल्याचे दिसून येत आहे़. त्यामुळे आता या सर्व गोष्टींकडे गावपुढारी व लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने पाहण्याची गरज आहे़
बोराडी येथे महिला डॉक्टरांना शिवीगाळ
बोराडी येथील आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ़निलीमा रमेशकांत देशमुख या १० रोजी सकाळी ८ वाजता ड्युटीवर असताना गावातील पंकज अशोक वाघ हा तिथे आला़. काहीएक कारण नसताना शिवीगाळ व दमदाटी करू लागला़. त्यास समजावून सांगितले की, लसीकरण सुरू आहे, येथून निघून जा, पण तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता़. शासकीय कामात अडथळा निर्माण करीत होता़. त्यामुळे पोलिसांना यासंदर्भात कळविल्यानंतर त्यांनी त्यास जेरबंद केले़. याबाबत सांगवी पोलिसात शासकीय कामात अटकाव करून शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे़