धुळे : येथील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात तसेच परिसरात असलेल्या अस्वच्छतेच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत असून, मूव्हमेंट फाॅर पीस ॲण्ड जस्टीस फाॅर वेल्फेअर संघटनेने घाणीच्या साम्राज्याचे फोटाे आणि व्हिडीओ चित्रीकरण रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांना नुकतेच सादर केले. याबाबत दोन दिवसांपूर्वी समाजवादी पार्टीनेदेखील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले होते. मूव्हमेंट फाॅर पीस ॲण्ड जस्टीस फाॅर वेल्फेअर संघटनेने अधिष्ठात्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून तसेच शेजारच्या जिल्ह्यातील रुग्णदेखील हिरे रुग्णालयात उपचारासाठी येतात. सध्या साथीचे आजार पसरल्याने स्वच्छता पाळण्याचे आवाहन आरोग्य विभाग वेळोवेळी करीत आहे. परंतु ज्या रुग्णालयात उपचार घेण्यासाठी रुग्ण येतात त्याच रुग्णालयात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. संबंधित अधिकारी आणि कर्मचारी या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत असल्याबद्दल संघटनेने खेद व्यक्त केला आहे. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच बालरोग विभागाची पाहणी केली होती. या विभागात स्वच्छता नसल्याचे आढळून आले. त्यामुळे रुग्णालय प्रशासन लहान मुलांच्या आणि त्यांच्या पालकांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप संघटनेने या वेळी केला. तीन ते चार दिवसांपासून या विभागात स्वच्छता झाली नसल्याचे रुग्णांच्या नातेवाइकांनी सांगितले. रुग्णालयातील विविध विभागांमध्ये तसेच रुग्णालय परिसरात नियमित स्वच्छता करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.
या वेळी अशपाक शेख, नदीम खान, फैज मिर्झा, अब्दुल सलाम, काझी नबीद, सलीम शाह, अब्दुल अलीम अन्सारी यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.