जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध- पालकमंत्री अब्दुल सत्तार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:35 IST2021-02-13T04:35:02+5:302021-02-13T04:35:02+5:30
धुळे : जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा वार्षिक योजनेचा २१० कोटी रुपये ...

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध- पालकमंत्री अब्दुल सत्तार
धुळे : जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा वार्षिक योजनेचा २१० कोटी रुपये खर्चाचा प्रारूप आराखडा मंजूर करण्यात आला आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.
पालकमंत्री सत्तार आज जिल्हा दौऱ्यावर होते. त्यांच्या हस्ते आज सकाळी शिंदखेडा तालुक्यातील माळीच येथे तापी नदीवरील पाणीपुरवठा योजनेचे उदघाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सरपंच कुसुमबाई भिल, उपसरपंच विलास पाटील, लघुसिंचन विभागाचे अभियंता ए.बी. पाटील, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी मोहिते, ग्रामसेवक शरद ठाकरे, माजी सरपंच गणेश करनकाळ यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
पालकमंत्री सत्तार म्हणाले की, जिल्ह्यातील पायाभूत सोयीसुविधांच्या विकासावर भर देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हा वार्षिक योजनेच्या बैठकीत यासंदर्भातील निर्देश प्रशासकीय यंत्रणेला दिले आहेत. जिल्ह्यातील दळण-वळण, आरोग्य, शैक्षणिक पायाभूत सोयी-सुविधांचे बळकटीकरण करण्यात येईल. धुळे येथील श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय व सर्वोपचार रुग्णालयात एमआरआय मशीन कार्यान्वित करण्यासाठी २० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्वसामान्य रुग्णांना या सुविधेचा लाभ मिळणार आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कमी खर्चात उत्कृष्ट कामगिरी बजावली. त्यामुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रणात राहिला. असे असले, तरी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव संपुष्टात आलेला नाही. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने राज्य शासनाच्या नियमांचे पालन करावे, असेही आवाहन पालकमंत्री सत्तार यांनी केले. माजी सरपंच करनकाळ यांनी मनोगत व्यक्त केले.