साडेसोळा लाखांची सुगंधित सुपारी पकडली; नरडाणा पोलिसांची कारवाई, दोघे ताब्यात
By देवेंद्र पाठक | Updated: June 24, 2023 18:33 IST2023-06-24T18:33:01+5:302023-06-24T18:33:57+5:30
ही कारवाई शुक्रवारी करण्यात आली असून शनिवारी सकाळी गुन्हा दाखल करण्यात आला.

साडेसोळा लाखांची सुगंधित सुपारी पकडली; नरडाणा पोलिसांची कारवाई, दोघे ताब्यात
धुळे : इंदूरकडून एका ट्रकमधून येणारी साडेसाेळा लाखांची सुगंधित सुपारी नरडाणा पोलिसांनी सापळा लावून पकडली. ट्रकचालक आणि सहचालक यांना पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई शुक्रवारी करण्यात आली असून शनिवारी सकाळी गुन्हा दाखल करण्यात आला.
मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरून बेकायदेशीररित्या राज्यात बंदी असलेली सुगंधित सुपारीची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती सहायक पोलिस निरीक्षक सुरेश शिरसाठ यांना मिळाली. त्यानुसार, आकांक्षा हॉटेलजवळ नरडाणा पोलिसांनी सापळा लावला. गोराणे फाट्याजवळ शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास एमपी १३ सीबी २४३३ क्रमांकाचा ट्रक पोलिसांनी थांबविण्याचा प्रयत्न केला. ट्रक थांबला नाही त्यामुळे पोलिसांना संशय आला. पोलिसांनी ट्रकचा पाठलाग सुरू करून ट्रक पकडला. विचारपूस केली असता उडवा-उडवीची उत्तरे मिळाल्याने पोलिसांनी ट्रकसह दोघांना ताब्यात घेतले. ट्रकची तपासणी केली असता ६ लाख ४८ हजार रुपये किमतीची सुपारी आणि १० लाखांचा ट्रक असा एकूण १६ लाख ४८ हजारांचा मुद्देमाल पकडण्यात आला. याप्रकरणी चालक महेंद्र रामू दावल (वय २७, रा. मलतार, ता. कसरावद जि. खरगोन, म.प्र.) आणि सहचालक हरीश जगदीश मडलोय (वय २१, रा. डाबरी, मलतार, ता. कसरावद जि. खरगोन, म.प्र.) या दोघांना अटक करण्यात आली.
पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, उपअधीक्षक सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सुरेश शिरसाठ व त्यांच्या पथकातील पोलिस उपनिरीक्षक मनोज कुंवर, पोलिस उपनिरीक्षक रामनाथ दिवे, कर्मचारी सचिन माळी, अहिरे, साळुंखे, अकिल पठाण, भरत चव्हाण, गजेंद्र पावरा, खांडेकर, विजय माळी यांनी कारवाई केली.