गाव काही अंतरावरच, त्यापूर्वी कार धडकली; दुचाकीस्वार ठार, साक्री तालुक्यातील देशशिरवाडे गावानजीकची घटना
By देवेंद्र पाठक | Updated: December 6, 2023 00:55 IST2023-12-06T00:55:26+5:302023-12-06T00:55:50+5:30
सचिन भामरे आणि देवासी पाटील हे दोघे रविवारी (एमएच १५ डीक्यू ९४३३) क्रमांकाच्या दुचाकीने जात होते.

गाव काही अंतरावरच, त्यापूर्वी कार धडकली; दुचाकीस्वार ठार, साक्री तालुक्यातील देशशिरवाडे गावानजीकची घटना
धुळे : साक्री तालुक्यातील देशशिरवाडे गावानजीक भरधाव कारने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील तरुण ठार झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात रविवारी साडेदहा वाजेच्या सुमारास घडला. सचिन दिलीप भामरे (वय २४) असे मयत तरुणाचे नाव आहे. तर देवासी युवराज पाटील (वय ३२, रा. उमरे, ता. साक्री) असे जखमीचे नाव आहे.
सचिन भामरे आणि देवासी पाटील हे दोघे रविवारी (एमएच १५ डीक्यू ९४३३) क्रमांकाच्या दुचाकीने जात होते. त्यादरम्यान त्यांना देशशिरवाडे गावाजवळ किरण कोठावदे यांच्या पत्र्यांच्या शेडसमोर समोरून येणाऱ्या भरधाव कारने जोरदार धडक दिली. त्यात गंभीर जखमी होऊन सचिन भामरे यांचा मृत्यू झाला. तर मागे बसलेला देवासी पाटील हा गंभीर जखमी झाला. दुचाकीचेही मोठे नुकसान झाले आहे. याबाबत संजय देवरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पिंपळनेर पोलिसात कारचालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक अमित माळी घटनेचा तपास करीत आहेत.