साक्री तालुक्यातील मलांजन गावात आतापर्यंत ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध होत आलेली आहे. यातून गावाच्या एकीचे दर्शन घडत होते. या ग्रामपंचायतीला स्मार्ट ग्रामपंचायतचा जिल्हा स्तरावरील प्रथम पुरस्कार प्राप्त झालेला आहे. गेल्या ५८ वर्षांपासून असलेली बिनविरोधची परंपरा यावेळी प्रथमच खंडित झालेली असून, ग्रामस्थांना आता मतदानाला सामोरे जावे लागणार आहे. सात सदस्यांसाठी ३ वाॅर्ड आहेत, वाॅर्ड क्र.१ मधे ३ सदस्यांसाठी समोरासमोर लढत होत आहे. तर वाॅर्ड क्र.२ मधे २ जागा या बिनविरोध झाल्या आहेत. वार्ड क्र. ३ मधे १ जागा बिनविरोध झाली असून एका सदस्यासाठी निवडणूक होत आहे. ७ सदस्यांमध्ये ३ सदस्य बिनविरोध तर ४ सदस्यांसाठी निवडणूक होत आहे, यात आता कोणत्या उमेदवाराचे किती वर्चस्व राहणार हे येथील मतदारच ठरवणार आहे. आता मलांजन ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सदस्यांचे गणित कोणाकडून जुळते याकडे तालुक्याचे लक्ष लागून आहे.
गावागावात आता गावाचे राजकारण बदलू लागले आहे. नवीन तरुण सदस्य ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भाग घेत आहेत, मलांजन ग्रामपंचायतमध्ये दोघे पॅनल प्रमुखांकडून विजयाचे दावे-प्रतिदावे केले जात असून, यात कोण सरस ठरणार ते निकालानंतर स्पष्ट होणार आहे.