धुळे : तालुक्यातील मोरदडतांडा येथे शुक्रवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास किराणा मालाची केवळ ५० रुपयांची उधारी चुकवली नाही, या कारणावरुन चौघांनी एकास मारहाण केली़ यात गंभीर जखमी झालेल्या परशुराम आनंदा चव्हाण (३४) या तरुणाचा मृत्यू झाला़ याप्रकरणी साहेबराव आनंदा चव्हाण यांच्या फिर्यादीवरुन धुळे तालुका पोलीस ठाण्यात चार जणांविरुध्द खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला़ यातील तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून एक फरार झाला आहे़धुळे तालुक्यातील मोरदडतांडा येथील परशुराम आनंदा चव्हाण या ३४ वर्षीय तरुणाकडे त्याचा चुलत भाऊ रघुनाथ इंदल चव्हाण याचे किराणा दुकानावरील उधारीचे ५० रुपये घेणे होते़ तीन ते चार महिने होऊनही पैसे देत नसल्याने १७ जुलै रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास चौघांनी दुकानासमोर अडवून परशुरामकडे पैशांची मागणी केली़ त्याने पैसे न दिल्याने शिवीगाळ करीत त्याला लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली़या मारहाणीनंतर जखमी झालेल्या परशुराम चव्हाण याला त्याचा मोठा भाऊ साहेबराव चव्हाण याने उपचारासाठी हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले़ उपचारानंतर पुन्हा आठ दिवसांनी त्याला येण्यास सांगितले़ जखमी परशुराम आणि त्याचा भाऊ साहेबराव हे दोघे मोरदडतांडा येथील त्यांच्या घरी आले़ १८ आणि १९ असे दोन दिवस घरी आराम केल्यानंतर २० जुलै रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास परशुराम याला त्रास होत असल्याने त्याला धुळ्यातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले़ दिवसभराच्या उपचारानंतर दुपारी सव्वा चार वाजेच्या सुमारास त्याची प्रकृति खालावली़ दुसऱ्या खासगी रुग्णालयात त्याला अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले होते़ त्याठिकाणी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास परशुराम याचे निधन झाले़या घटनेनंतर रात्रीच मयत परशुरामचा भाऊ साहेबराव चव्हाण याने धुळे तालुका पोलीस ठाणे गाठत फिर्याद दिली़ मंगळवारी पहाटे चुलतभाऊ रघुनाथ इंदल चव्हाण, प्रेम इंदल चव्हाण, भिकन इंदल चव्हाण, इंदल काशिनाथ चव्हाण या चार संशयितांविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला़ तपास धुळे तालुका पोलीस करीत आहेत़
५० रुपयांच्या उधारीने घेतला जीव खुनाचा गुन्हा दाखल, तिघे ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 21:56 IST