विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डॉ. डी. यू. डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे जिल्हा अंतर्गत कायदेविषयक जनजागृती यात्रा काढण्यात आली. एकाच दिवसात १० गावात कायद्यांचा जागर करण्यात आला. बिलाडी, न्याहळोद, विश्वनाथ, सातारने, नावरा, नावरी, नवलनगर, फागणे, बाळापूर आणि धुळे शहरात कायद्यांबाबत प्रबोधन करण्यात आले. कायदा केवळ शैक्षणिक स्तरावर अभ्यासला जातो; परंतु कायदा ही जीवन सौंदर्य खुलवणारी सामाजिक बाब असून, कायदेविषयक प्रचंड अनभिज्ञता हीच मोठी समस्या आज भारतापुढे आहे. विधी सेवा प्राधिकरण ही न्याय विभागाची प्रशासकीय यंत्रणा तमाम वंचित, दुर्बल, अल्पसंख्यांकांच्या न्याय्य हक्कांसाठी मोफत सेवा देण्यासाठी कटिबद्ध असणारी यंत्रणा आहे. विधी सेवा अर्थात लोकन्यायालय हे मध्यस्थी केंद्र आहे. जलद न्यायदानाकरिता पर्यायी वाद निराकरण यंत्रणेस उत्तेजना देण्याचा प्रयत्न त्या माध्यमातून होतात. मध्यस्थी म्हणजे दिवाणी प्रक्रिया संहितेच्या कलम ८९ अन्वये अभिप्रेत असणाऱ्या पर्यायी वाद निराकरणाचाच एक भाग आहे. म्हणजेच पारंपरिक न्यायदान यंत्रणेचे स्वरूप आहे. ऐच्छीकवाद निराकरण अशी कार्य पद्धती असलेल्या या प्रक्रियेत विवादक पक्षकारांना एकत्र आणून त्यांच्या परस्पर संमतीने समझोता घडवून आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या तटस्थ व्यक्तिचा सहभाग असतो. मुंबई उच्च न्यायालय मध्यस्थी केंद्र, हे दिवाणी प्रक्रिया संहितेच्या कलम ८९ मधील उद्देशांना अमलात आणण्याकरिता एक प्रकल्प आहे. वकील वर्गाच्या पाठिंब्याने तो राबविणे अपेक्षित असते. त्यानुसार धुळे जिल्हा विधी सेवा सातत्याने कार्यरत आहे, असे प्रतिपादन विधी सेवा प्राधिकरणाच्या मार्गदर्शकांनी आपल्या भाषणात व्यक्त केले.
यावेळी ॲड. चेतना पिसोळकर, ॲड. पूजा यादव, ॲड. श्यामल भामरे, प्रदीप पाटील, अमोल मराठे, अल्केश पातुरकर, आसिम शेख, अमोल माळी, कार्यालयीन अधीक्षक बापू माळी, भरत पारोळेकर, अण्णा बागुल, भरत गोरे आदींनी जनजागृती यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.
कायदेविषयक ११ प्रबोधन शिबिरे
एकाच दिवसात कायदेविषयक ११ प्रबोधन शिबिरे झाली. प्रा घन:श्याम थोरात यांच्या मार्गदर्शनात विधी सेवेच्या टीमने हा अनोखा उपक्रम राबविला. प्रत्यक्ष न्यायालयाचे प्रतिनिधी उपस्थित राहून गावकऱ्यांना लोक न्यायालय, लोक अदालत आणि मूलभूत हक्क, अधिकार यांची माहिती देत माहिती पत्रक वाटत होते. सदर उपक्रमाचे धुळे न्यायालयाचे मुख्य सत्र न्यायाधीश एच. मोहम्मद यांनी कौतुक केले. मानवी हक्क-अधिकार, कौटुंबिक हिंसाचार, ट्राफिक सेन्स, मानसिक ताण, राष्ट्रीय एकात्मता, भारतीय संविधान, महापुरुषांची विचारधारा असे अनेक विषय घेऊन प्रा. घन:श्याम थोरात लवकरच दूरचित्रवाहिनीवर कीर्तन करताना दिसणार आहेत. राष्ट्रीय प्रबोधनकार कोरडे महाराज आणि आप्पासाहेब ताजने यांचे विशेष मार्गदर्शन आणि प्रोत्साहन त्यांना लाभत आहे.