धुळे : वाहतुकीचे नियम न पाळणे, प्रवाशांची पळवापळवी करणे, मनमानी भाडे आकारणी करणे या कारणांमुळे रिक्षाचालकांबद्दल अनेकांच्या मनात रोष आहे. रिक्षाचालकांसोबत काहींना चांगले तर काहींना वाईट अनुभवही येतात. प्रवासी बसविण्यासाठी लेफ्ट-राइट करीत असल्याने प्रवाशांना वैताग येतो.
शहरात अधिकृत रिक्षा स्टाॅप आहेत. अटी-शर्तींच्या आधारे रिक्षा स्टाॅपला परवानगी मिळते. परंतु काही रिक्षाचालक अधिकृत स्टाॅपवर न थांबता लांब थांबतात. एका प्रवाशावर स्टाॅपवरची रिक्षा निघत नाही. अशा प्रवाशांना बसवून वारंवार रस्त्याच्या दोन्ही बाजुला जावून रिक्षा मागे-पुढे नेली जाते आणि एक-एक प्रवासी करत तीन-चार प्रवासी झाल्यावर रिक्षा मार्गाला लागते. तोपर्यंत रिक्षात आधीपासून बसलेले प्रवासी अक्षरश: वैतागतात. याशिवाय बस स्थानकासह शहराबाहेर असलेल्या दवाखान्यांच्या परिसरात रात्रीच्या वेळी मनमानी भाडे आकारले जाते. ठरलेले भाडे कबूल केल्याशिवाय एकही रिक्षाचालक प्रवासी घेत नाही, असा वाईट अनुभव अनेकांना आहे. परंतु काही रिक्षाचालक मात्र नंबर आल्यावर योग्य भाडे आकारतात, असा चांगला अनुभवही प्रवाशांना आहे.
पूर्वी रिक्षाचालक म्हटले की, त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच प्रवाशांचा वेगळा होता. परंतु आता तशी परिस्थिती नाही. रोकड आणि दागिने असलेल्या पिशव्या रिक्षाचालकांनी प्रामाणिकपणे परत करण्याची अनेक उदाहरणे आहेत. पोलीस खात्याने अशा रिक्षाचालकांचा सत्कार केल्याच्याही घटना घडल्या आहेत. जबाबदारीचे भान ठेवून आणि नियमांचे पालन करून प्रवासी वाहतूक केली जाते.
बसस्थानक
बसस्थानकावर अधिकृत रिक्षा स्टाॅप वगळता इतर रिक्षाचालक रस्त्यावर रिक्षा लावून एक एक प्रवासी बसवितात. इतर प्रवासी घेण्यासाठी लेफ्ट-राइट करत असतात.
रेल्वेस्थानक
सध्या धुळे-चाळीसगाव रेल्वे बंद असल्याने प्रवासी नाहीत. परंतु रेल्वे सुरू असल्यावर काही रिक्षाचालक अवाच्या सव्वा भाडे आकारतात. अधिकृत स्टाॅपवर तसा प्रकार नाही.
महापालिका चाैक
महानगरपालिकेच्या जुन्या तसेच नव्या इमारतीच्या चाैकातदेखील तसाच प्रकार घडतो. अधिकृत रिक्षा स्टाॅपवर रिक्षा न लावता काही जण रस्त्याच्या दोन्ही बाजूला वारंवार रिक्षा लावतात.
प्रवाशांना त्रास
मी मुंबईला माहेरी जाऊन परत आली त्यावेळी मनमाडपर्यंत रेल्वेने आणि तेथून बसने धुळ्याला आली. रात्री उशीर झाल्याने मुलांसह रिक्षाने जावे लागले. रात्रीची वेळ असल्याने जास्तीचे भाडे द्यावे लागले.
- एक प्रवासी,
काैटुंबिक जबाबदारी असलेले रिक्षाचालक नेहमी साैजन्याने वागतात. भाडेदेखील योग्य घेतात. परंतु कधी कधी एखाद्या रिक्षाचालकाचा वाईट अनुभव येतो. चांगले रिक्षाचालक आदर्श ठरतात.
- एक प्रवासी
वेळोवेळी जनजागृती
रिक्षाचालकांच्या बैठक घेऊन वेळोवेळी वाहतूक नियमांची जनजागृती केली जाते. प्रवाशांसोबत साैजन्याने वागण्याच्या सूचना त्यांना दिल्या जातात.
- धिरज महाजन, पोलीस निरीक्षक
मनमानी भाडे
शहरातील काही भागांत रिक्षाचालकांकडून मनमानी भाडे आकारले जात असल्याची ओरड आहे.
धुळे बसस्थानकावर रात्रीच्या वेळी अवाच्या सव्वा भाडे आकारले जाते. दुप्पट दुप्पट भाडे लागते.
शहराबाहेर असलेल्या दवाखान्यांच्या परिसरातदेखील रात्री मनमानी भाडे आकारले जाते.
सुज्ज्ञ रिक्षाचालक मात्र प्रवाशांकडून योग्य भाडे घेऊन त्यांना चांगली सेवा देतात.