विधानसभा निवडणुकीचे पडसाद उमटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 11:29 IST2019-11-25T11:28:48+5:302019-11-25T11:29:04+5:30
साक्री तालुका : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुकांची मोर्चेबांधणी

विधानसभा निवडणुकीचे पडसाद उमटणार
आबा सोनवणे ।
आॅनलाइन लोकमत
साक्री : भाजपच्या मेगा भरती मध्ये तालुक्यातील काँग्रेसच्या नेत्यांनीही या पक्षात प्रवेश केल्याने, तालुक्यात भाजपचे पारडे जड झाले. असे असले तरी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. त्याचे पडसाद आता येऊ घातलेला जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत उमटण्याची शक्यता आहे. विधानसभेत अपयश आल्यानंतर आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत हे नेते त्याची भरपाई करणार का? याचे मोठे औत्सुक्य तालुक्याला लागलेले आहे.
साक्री तालुक्यात जिल्हा परिषदेचे १७ गट आहेत. त्यापैकी कासारे, निजामपूर, व दुसाने हे तीन गट सर्वसाधारण आहेत. गेले तीन टर्म साक्री तालुक्याने जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषविले आहे. आगामी निवडणुकीत साक्री तालुक्याचा वरचष्मा राहणार का? याविषयी आता साशंकता निर्माण झाली आहे. कारण स्वत: शिवाजीराव दहिते हे या वेळेस निवडणूक लढवणार नसल्याचे संकेत आहेत. त्यांच्याऐवजी त्यांचे सुपुत्र हर्षवर्धन दहिते हे निवडणूक लढवतील, अशी चर्चा आहे. परंतु त्यांचा स्वत:चा सामोडे गट हा राखीव झाला असल्याने, ते कासारे गटातून निवडणूक लढविण्यास इच्छूक आहेत. यावेळेस कासारे गटाचीची लढाई तगडी राहणार आहे. कारण याच गटातून शिवसेनेचे तालुकाप्रमुख व प्रथम लोकनियुक्त सरपंच विशाल देसले व त्यांचे बंधू सचिन देसले हे उमेदवारी करण्यास इच्छूक आहेत. माजी पंचायत समिती सदस्य गोकुळ परदेशी हे येथून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. भाजपचे प्रांतिक सदस्य सुरेश रामराव पाटील हेही कदाचित येथून आपले नशीब आजमावू शकतात. त्यांच्यापुढे कासारे दुसाने व निजामपूर असे तीन गटांचे पर्याय उपलब्ध आहेत.
जिल्हा परिषदेवर भाजपचे वर्चस्व राहिले तर ते अध्यक्षपदाचे दावेदार असू शकतात. हर्षवर्धन दहिते व सुरेश पाटील हे एकाच पक्षात असल्याने त्यांच्या गटांची अदलाबदल होऊ शकते, ही शक्यता आहे. विशाल देसले किंवा सचिन देसले यांच्यापैकी कोण उमेदवारी करतो, यावर बरेच अवलंबून राहणार आहे.
राज्यात भाजप-शिवसेनेची युती तुटल्यामुळे समीकरणे बदलली आहेत.प्रमुख राजकीय नेते हे भाजपत गेल्याने, आता बिगर आदिवासी भागात शिवसेना विरुद्ध भाजप अशी लढत होईल. तर आदिवासी भागात काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत राहील. आदिवासी भागातील काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी अपक्ष उमेदवार मंजुळा गावित यांना पाठिंबा देऊन काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करण्यास हातभार लावला होता. परंतु तेच नेते आता काँग्रेसमध्ये असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे पिंपळनेर व दहिवेल पट्ट्यात मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.
तशीच परिस्थिती पंचायत समितीच्या ३४ गणांमध्ये राहणार आहे. यापैकी १४ गण हे सर्वसाधारण ओबीसी राखीव महिला व पुरुषांसाठी आहेत. येथेही चुरस सर्वसाधारण व ओबीसी गणांमध्ये दिसून येईल. त्यातही महत्त्वाचा असलेला धाडणे, कासारे, म्हसदी, धमणार, निजामपूर येथे मोठी चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे.
जिल्हा परिषदेचे गट व गणांमध्ये इच्छुक उमेदवारांनी आतापासूनच चाचणी सुरू केली आहे. आता कोणाकोणाला संधी मिळते, ते येत्या काही दिवसातच स्पष्ट होणार आहे.