उसनवारीने दिलेले १५ लाख मागितल्याने दमदाटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 22:17 IST2021-02-20T22:17:21+5:302021-02-20T22:17:30+5:30
संशयित पद्नाभनगरचे : तालुका पोलिसात गुन्हा

उसनवारीने दिलेले १५ लाख मागितल्याने दमदाटी
धुळे : उसनवारीने दिलेले १५ लाख रुपये परत मागितल्याच्या कारणावरुन धुळे तालुक्यातील बोरविहिर येथील एकाला दमदाटी करण्यात आली. याप्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
धुळे तालुक्यातील बोरविहिर येथील पंकज दामू कदम या २८ वर्षीय तरुणाने फिर्याद दाखल केली. त्यानुसार, सुभाष दौलत पाटील आणि सुमीत सुभाष पाटील (दोघे रा.पद्नाभनगर, साक्री रोड, धुळे) यांना १५ लाख रुपये उसनवारीने दिलेले होते. त्यांच्याकडे दिलेले पैसे परत घेण्यासाठी वेळोवेळी मागणी केली, पाठपुरावा केला. पण, त्यांनी काही पैसे परत केली नाही. त्यांनी पैसे परत न करता उलट माझी एकप्रकारे फसवणूक केली आहे. त्यांच्याकडे पैसे मागण्यासाठी गेलो असता त्यांनी हातपाय तोडण्याची धमकी दिली. तसेच कायद्याला आम्ही जुमानत नसल्याचे सांगून उलट दमदाटी केली. त्यानुसार, सुभाष दौलत पाटील आणि सुमीत सुभाष पाटील या दोन्ही संशयितांविरुध्द फिर्याद दाखल केल्याने विविध कलमान्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस घटनेचा तपास करीत आहेत.