रेल्वे स्टेशनवर बोगी इंडिकेटर नसल्याने, प्रवाशांची धावपळ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2022 16:39 IST2022-11-11T16:24:30+5:302022-11-11T16:39:55+5:30
रेल्वेस्टेशनवर प्रवाशांना विविध प्रवासी गाड्यांची वेळ, प्लॅटफॉर्म व रेल्वे डब्याचा स्थानकात थांबण्याचा क्रम समजावा म्हणून रेल्वेस्टेशनवर इंडिकेटर (डिस्प्ले) लावलेला असतो.

रेल्वे स्टेशनवर बोगी इंडिकेटर नसल्याने, प्रवाशांची धावपळ!
दोडाईचा रेल्वेस्थानकावर लांब पल्ल्याच्या गाड्यांसह ४२ प्रवासी गाड्या थांबतात. येथून शेगाव, तिरूपती बालाजी जाणे सोयीस्कर आहे. मुंबई, सुरत, अहमदाबाद येथील जैन बांधव दोडाईचा येथून बळसाणे येथे दर्शनासाठी जातात. व्यापार, उद्योगसाठी व्यापारी जळगाव, अहमदाबादला जातात. वर्षाकाठी हजारो प्रवाशांची ये- जा या स्टेशनवरून होते.
रेल्वेस्टेशनवर प्रवाशांना विविध प्रवासी गाड्यांची वेळ, प्लॅटफॉर्म व रेल्वे डब्याचा स्थानकात थांबण्याचा क्रम समजावा म्हणून रेल्वेस्टेशनवर इंडिकेटर (डिस्प्ले) लावलेला असतो. इंडिकेटरमुळे प्रवाशांना डब्याची स्थिती माहीत होत असल्याने प्रवासी त्या जागी थांबून असतात. साहित्य त्या ठिकाणी नेऊन ठेवता येते, गाडी आल्याबरोबर त्या डब्यातील जागेवर बसता येते. किमान २३ डब्यांची गाडी असून त्यात सर्वसाधारण, वातानुकूलित, स्लीपर कोच, दिव्यांग असे डबे असतात. ध्वनिक्षेपणावरून प्रवाशांना गाडीची वेळ कळते; परंतु, इंडिकेटर नसल्याने डबा शोधण्यासाठी प्रवाशांना धावपळ करावी लागते. आरक्षण डबा, कुठे येणार व जनरल डबा कुठे थांबणार, हे प्रवाशांना कळत नसल्याने प्रवाशांची तारांबळ उडत आहे. वयोवृद्ध, महिला, बालक यांचे इंडिकेटर नसल्याने हाल होत आहेत. गाडी कमी वेळ थांबत असून त्या वेळेत डबा शोधणे मोठे दिव्य ठरत आहे.
गाडी स्थानकात येताच आपला डबा शोधण्यासाठी प्रवाशांना साहित्यासह धावपळ करावी लागते, त्यांची तारांबळ उडते. याचा गैरफायदा भुरटे चोर घेतात. त्यामुळे प्रवासात संताप निर्माण झाला आहे. रेल्वे प्रशासनाने दोडाईचा रेल्वेस्टेशनवर इंडिकेटर (डिस्प्ले) स्वयंचलित इलेक्ट्रॉनिक रेल्वे स्थितीदर्शक यंत्र कार्यान्वित करावे, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.