All parties favorable for development in Dhule Zilla Parishad elections | धुळे जिल्हा परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीसाठी तीनही पक्ष अनुकूल
धुळे जिल्हा परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीसाठी तीनही पक्ष अनुकूल

आॅनलाइन लोकमत
धुळे : जिल्हा परिषद व त्या अंतर्गत येणाऱ्या चारही पंचायत समितींच्या निवडणुकीसाठी राज्याप्रमाणेच स्थानिक पातळीवर शिवसेना, कॉँग्रेस व राष्टÑवादी कॉँग्रेस व महासंग्राम मिळून महाविकास आघाडी करण्यास चारही पक्षांच्या नेत्यांनी अनुकूलता दर्शविली आहे. या पक्षांची आज प्राथमिक बैठक झाली. त्यात जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीचा फेंडा फडकेल असा विश्वास व्यक्त केला.
राज्यात शिवसेनेसह कॉँग्रेस, राष्टÑवादी कॉँग्रेस या पक्षांनी महाविकास आघाडी स्थापन करून राज्यात सत्ता स्थापन करून भाजपला सत्तेपासून दूर ठेवले आहे. तोच प्रयोग स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतही करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, आणि मा.आ. अनिल गोटे यांच्या लोकसंग्राम या पक्षांची महाविकास आघाडी करण्यासंदर्भात आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्राथमिक स्वरूपात बैठक घेण्यात आली. आमदार कुणाल पाटील यांच्या शहर संपर्क कार्यालयात ही बैठक झाली. बैठकीला साक्रीच्या आमदार मंजुळा गावित, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शाम सनेर, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख हिलाल माळी, हेमंत साळुंखे, माजी जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण शिंदे, माजी जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे,काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष गायत्री जयस्वाल उपस्थित होते.
भारतीय जनता पक्षाला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत धडा शिकवण्यासाठी महाविकास आघाडी महत्वाची आहे. सर्वांनी संघटितपणे काम करून महाविकास आघाडीच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीतील सर्व उमेदवारांना निवडून आणण्याबाबत चर्चा झाली. दरम्यान या निवडणुकीत जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकेल असा विश्वास सर्वच पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केला. बैठकीत सर्वच नेत्यांनी महाविकास आघाडी करण्याबाबत अनुकूलता दर्शविली असून एकंदरीत चर्चा सकारात्मक दिशेने पुढे सरकली आहे.
बैठकीला बाजार समितीचे माजी सभापती गुलाबराव कोतेकर, पंचायत समितीचे माजी सभापती भगवान गर्दे, बाजीराव पाटील, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस डॉ. दरबारसिंग गिरासे, मार्केटचे उपसभापती रितेश पाटील, पंढरीनाथ पाटील, अविनाश महाजन, संतोष अण्णा पाटील, डॉ. विजय देवरे, काँग्रेस युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हर्षल साळुंखे, राज्य सरचिटणीस राजीव पाटील, अरुण पाटील, संचालक बापू खैरनार, आदी पदाधिकारी उपस्थित होते. तीनही पक्षाच्या कार्यकर्ते,पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

Web Title: All parties favorable for development in Dhule Zilla Parishad elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.