सिटी स्कोर होता १४, माजी सैनिकाच्या हिमतीचे होतेय कौतुक
धुळे : तालुक्यातील चितोड येथील रहिवासी असलेल्या रतन खरे यांनी तब्बल ३२ दिवस रुग्णालयात राहून कोरोनावर यशस्वी मात केली आहे. भारतीय सैन्य दलात ३६ वर्षे सेवा बजावलेल्या या माजी सैनिकाने दाखवलेल्या लढाऊ बाण्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
७० वर्षीय खरे यांचा २० मार्च रोजी कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर ते जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले. त्यावेळी त्यांची प्रकृती चांगली होती. तसेच सिटी स्कॅनचा स्कोर केवळ एक इतका होता. मात्र, रुग्णालयात दाखल झाल्यानंतर तीन दिवसांनी त्यांची प्रकृती अधिक खराब झाली. ऑक्सिजनची पातळी कमी झाली तसेच फुफ्फुसात संसर्ग वाढून सिटी स्कॅनचा स्कोर १४ इतका वाढला होता. सतत ३२ दिवस त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यापैकी २४ दिवस त्यांना ऑक्सिजन लावला होता. ऑक्सिजनची पातळी ६० पर्यंत कमी झाली होती. मात्र, सकारात्मक विचार व कोरोनाची भीती न बाळगल्याने त्यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महेश भडांगे, आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी भामरे व आरोग्य कर्मचाऱ्यांबद्धल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
३२ दिवस राहिले रुग्णालयात -
रतन खरे यांना छातीत दुखणे, चालताना दम लागणे अशा स्वरूपाचा त्रास होत असल्याने त्यांनी कोरोना चाचणी केली होती. २२ मार्च रोजी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्यांच्या पत्नी ६५ वर्षीय मीना यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला. त्या सात दिवस उपचार घेऊन बऱ्या झाल्या. मात्र, ७० वर्षीय खरे ३२ दिवस रुग्णालयात राहून २१ एप्रिल रोजी घरी परतले.
पोटावर झोपणे ठरले फायदेशीर -
रुग्णालयात असताना दोन ते तीन तास पोटावर झोपत होतो. त्यामुळे ऑक्सिजनच्या पातळीत वाढ होत होती. पोटावर झोपण्याचा फायदा झाल्याचे खरे सांगतात. तसेच इंजेक्शन व गोळ्यांनी रक्तातील साखरेचे प्रमाण वाढत होते. आता मात्र ते नियंत्रणात असल्याचेही त्यांनी सांगितले.
बाबांसारखे आनंदी राहायचे -
जिल्हा रुग्णालयातील वातावरण, तत्पर आरोग्य कर्मचारी व योग्य उपचार यामुळे कोरोनाची कधीच भीती वाटली नाही. रुग्णालयात नेहमी आनंदी राहायचो, पोटभर जेवण करायचो. डॉक्टरही इतर रुग्णांना माझ्याकडे बोट दाखवत बाबा कसे आनंदी राहतात, तसे राहायचे, असे सांगत होते, असा किस्सा खरे यांनी सांगितला.